आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाबकी रोडवरील विद्युत पोल होणार भूमिगत:रस्त्याचे रुंदीकरण होणार, विविध प्रभागातील विकास कामांसाठी 10 कोटींचा निधी

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुने शहरातील अत्यंत वर्दळीच्या डाबकी रोडच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. रुंदीकरणात अडथळा ठरणारे विद्युत पोल भूमिगत केले जाणार आहे. याकामासह विविध प्रभागात विविध विकास कामे होणार असून यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी दहा कोटी रुपयाचा निधी शासनाकडून मंजुर करुन आणला आहे.

जुने शहरात डाबकी रोड हा एकमेव महत्वाचा मार्ग आहे. या रोडला विविध वस्त्या जोडल्या आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांना नविन शहरात जाणे-येणे करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. या रस्त्याचे 16 कोटी रुपयाच्या रस्त्याच्या कामात काँक्रीटीकरण झाले. मात्र रुंदीकरण झाले नाही. सातत्याने लोकसंख्या वाढत असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज होती. रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी नागरिकांनी लावून धरली होती.

रस्ता रुंदीकरणासाठी अनेक घरांचे बांधकाम पाडावे लागणार होते. ही बाब लक्षात नागरिकांची घरे न पाडता, रुंदीकरणात अडथळा ठरणारे विद्युत पोल भूमिगत करण्याचे निश्चित करण्यात आले. कस्तुरबा गांधी महिला रुग्णालय (भिरड हॉटेल) ते कॅनॉल पर्यंत विद्युत केबल भूमिगत केली जाणार आहे. यासाठी 1 कोटी 41 लाख रुपये खर्च केले जाणार असून विद्युत केबल भूमिगत केल्या नंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन ते तीन मिटर रुंदीकरण केले जाणार आहे. यासाठी 1 कोटी 9 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्या नंतर या मार्गावरील दाट वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

डाबकी रोडच्या रुंदीकरणासोबत विविध प्रभागात रस्त्याचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण, खडीकरण, नालीचे बांधकाम तसेच जीम आदी विविध कामे केली जाणार असून डाबकी रोडसह या सर्व कामांवर 10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...