आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोल्यामध्ये रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. वीजेच्या जोरदार कडकडाटासह जवळपास पाऊनतास पाऊस कोसळला. पावसामुळे ग्रामीण भागात प्रचंड नुकसान झाले आहे. बोरगाव मंजू परिसरात मजलापूर दापुरा येथे शेतात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर पातूर कोळंबीजवळ दोन युवक वाहून जाण्यापासून थोडक्यात बचावले आहे. याशिवाय ग्रामीण भागामध्ये पावसामुळे फळबागांचे प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
शेतकऱ्याचा शेतात जागीच मृत्यू
अकोल्यामध्ये 16 ते 19 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत चांगला रिमझिम पाऊस झाला. यामुळे शेतकरी आनंदात होते. मात्र, रविवार(19 जून) च्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात बोरगाव मंजू येथे शेतात काम करीत असताना एका शेतकऱ्याचा रविवारी जागीच अंत्य झाला आहे. माहितीनुसार शेतकरी शेक इसामोद्दीन शेक इकरामोद्दीन (वय 55 वर्ष) सायंकाळी शेतात काम करीत होते. यावेळीजोरदार पावसात व विजेच्या कडकडाटामध्ये अचानक त्याच्या अंगावर वीज पडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे शव अकोला शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टमकरिता बोरगाव मंजू ठाणेदार सुनील सोळंके यांच्यासह रवाना करण्यात आले आहे.
तेल्हारा, पातूरमध्ये मोठे नुकसान
रविवारच्या पावसामुळे तेल्हारा तालुक्यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय पातूर तालुक्यामध्ये फुलांच्या शेती उध्वस्त झाल्याची माहिती आहे. पातूरमध्ये मोठ्या प्रमाणात फुलशेती होते. पावसामुळे येथे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
युवक थोडक्यात बचावले
पावसामुळे कोळंबी जवळील पातूर फाट्यावरील नाल्याच्या पाण्याचा वेग वाढला. यावेळी हिरपूर येथील दोघेजन दुचाकीसह खांबोर्यावरुन गावी हिरपुरला जात असताना सुसाट वेगाने वाहत असलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. मुख्य म्हणजे उपस्थितांनी त्यांना नाला पार करण्यापासून थाबविले. मात्र, त्यांनी पूल पार करायला सुरुवात केली. यावेळी पाण्याच्या प्रचंड ओढ्यात युवक वाहून गेले. दरम्यान काहिच अंतरावर दोघांना बाहेर काढण्यात यश आले. पण यात त्यांची दुचाकी वाहून गेली. रणजीत घोगरे, विरेंद्र देशमुख, राम उमाळे, विकी खांदेल, प्रमोद गोगटे, संदीप फुलझले यांनी युवकांना बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
वीजेपासून रहा सुरक्षित
- मेघगर्जनेसह विजा आणि पावसाच्या वातावरणाची पूर्व कल्पना येताच शेतकरी शेतमजूरांनी त्वरीत शेताजवळील घराचा आसरा घ्यावा.
- पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक किंवा कोरडा पालापाचोळा घ्या.
- दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून तळपायावर बसा.
- ओलीताचे शेतशिवार किंवा तलावामध्ये काम करणाऱ्यांनी तत्काळ बाहेर यावे.
- उंच झाडापासून लांब उभे राहावे.
- मोकळ्या जमिनीवरील खोलगट भागात गुडघ्यात वाकून बसा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.