आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात पेरण्या रखडल्या:अपुऱ्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त; 24 ते 27 जून पावसाची शक्यता

अकोला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला शहराच्या विविध भागात गुरुवारी, 23 जूनला दुपारी तीन नंतर मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात अद्याप पेरण्या रखडल्या असून पावसाची प्रतीक्षा असताना गेल्या दोन दिवसांपासून आकाशात जमणारे ढग हुलकावणी देत आहेत.

जोरदार पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार अभ्यासकांनी दुपारी साडेचार वाजेपर्यंत अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, हिंगनघाट, चंद्रपूर, गडचिरोली व ब्रम्हपुरी परिसरात हलक्या पावसाची शक्यता वर्तविली होती. तर नागपूर, काटोल, रामटेक, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

जिल्ह्यातील अनेक भागात पहिल्या दोन पावसाने दिलासा मिळाला. जमिनीची ओल पाहून 10 टक्क्यांहून अधिक पेरण्या आटोपल्या असल्या तरी. अनेक भागांत आणखी एक ते दोन समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे. अशात गेल्या तीन दिवसांपासून दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी होते. मात्र अवघ्या रिमझिम पावसावर समाधान मानावे लागते. त्यामुळे पुढील तीन दिवसांत जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाल्यास बहुतांश पेरण्या आठवडाभरात मार्गी लागू शकतील.

असा आहे अंदाज

अमरावती येथील हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जूनला संपूर्ण विदर्भात बर्‍याच ठिकाणी गडगडटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 25 जूनला अमरावती, अकोला, बुलडाणा, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो. 26 व 27 जूनलाही पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

आतापर्यंत 85.3 मिमी पाऊस

अकोला जिल्ह्यात आतापर्यंत आतापर्यंत एकूण 85.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 127.1 मिलीमीटर पाऊस हा एकट्या अकोला तालुक्यात झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...