आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खत प्रयोग कार्यशाळा:2 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन; कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते उद्घाटन

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाद्वारे ज्वारी आणि गहू पीक पद्धतीवर आधारित दीर्घ मुदतीय खतांचा वापर व जमिनीचे आरोग्य तथा पिकांची उत्पादकता विषयक 'अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प' कार्यरत आहे.

या विषयावर सविस्तर चर्चा होण्यासाठी १७ डिसेंबरला दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये देशातील १८ विविध ठिकाणी सुरू असलेले दीर्घ मुदतीय खत प्रयोग यावर आधारित निष्कर्ष चर्चिले जाणार आहेत. सदर कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेत होणार आहे.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथील नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या विभागाचे उपमहासंचालक डॉ. सुरेश कुमार चौधरी यावेळी प्रमुख उपस्थित राहतील. कार्यशाळेस भारतीय मृदा विज्ञान संस्थान भोपाळ येथील माजी संचालक डॉ. ए. के. पात्रा, भारतीय मृदा विज्ञान संस्थान भोपाळ येथील कार्यवाहू संचालक डॉ. ए. बी. सिंग, तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील माजी कुलगुरू डॉ. अशोक धवन यांच्या विशेष उपस्थितीसह विद्यापीठातील पदाधिकारी उपस्थित असतील.

यामध्ये डॉ. विलास खर्चे, डॉ. एस. एस. माने, डॉ. डी. बी. उंदीरवाडे यांचाही सहभाग असेल. कुलगुरुंच्या मार्गदर्शनात विभाग प्रमुख मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र डॉ. एस एम भोयर, तसेच भारतीय मृदा विज्ञान संस्थान भोपाळ अंतर्गत अखिल भारतीय समन्वित प्रकल्प दीर्घ मुदतीय खत प्रयोग येथील डॉ.आर. एच. वंजारी आणि दीर्घ मुदतीय खत प्रयोग प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. डी. जाधव, डॉ. बी. ए. सोनुने कार्यशाळेसाठी प्रयत्नशील आहेत.

कार्यशाळेत विविध तांत्रिक सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विविध पिकांमध्ये दीर्घ मुदतीय खत प्रयोगाचे निष्कर्ष यावर विस्तृत चर्चा होऊन पिकांच्या अधिक उत्पादनासाठी आणि जमिनीच्या शाश्वततेसाठी भविष्यात आवश्यक विविध उपाय योजना तसेच विभागनिहाय संशोधन यावर विचार मंथन होऊन धोरण निश्चित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच दीर्घ मुदतीय खत प्रयोग या विषयावर कार्यशाळा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...