आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाबीज बियाणांचा तुटवडा:शेतकऱ्यांमध्ये नाराजी, बियाणे आणि खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा

अकोला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बियाणे आणि खतांच्या दरात प्रचंड दरवाढ झाली आहे. मागील वर्षाप्रमाणे निसर्गाच्या लहरीपणामुळे जर दुबार पेरणीचे संकट आले तर एवढे महागडे दुसऱ्यांदा बियाणे घेणे शक्य होणार का ? या विवंचनेत सध्या शेतकरी वर्ग असल्याचे दिसून येत आहे. यात महाबीज बियाणे मात्र बाजारातून गायब आहेत. खतांच्या भावामध्ये देखील दरवाढ आहे. काही खतांचे भाव तर दाम दुप्पट भावाने वाढल्याचे दिसून आले.

अशी आहे भाववाढ

यावर्षी महाबीजचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी वर्गात उलट-सुलट चर्चा होत आहे. शेतकऱ्यांना महाबीज बियाणे 30 किलोसाठी 2250 वरून 3900 रुपयापर्यंत भाववाढ झाली आहे. म्हणजेच 6500 रुपये क्विंटल असलेले सोयाबीन 12 हजार ते 13 हजार रुपये क्विंटल दराने म्हणजे दामदुप्पट झाले आहे.

बीटी कॉटन बियाण्याचे दर देखील वाढले आहे. रासायनिक खतांमध्ये सुपर फास्फेटचे दर 360 वरून 550 रुपयांवर गेले आहेत. तर डीएपी खतांचा भाव 1200 रूपयांवरून 1350 रुपये, 20:20:0:13 खत 1050 रूपयांवरून 1450 रुपये, 10:26:26 खतांची किमत 1180 वरून 1470 रुपये आणि एम.ओ.पी.(पोटँश) 950 रूपयांवरून 1700 रुपये एवढी दरवाढ झाली आहे. मालाचा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे मालाचा तुटवडा का होत आहे याबाबत शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

शेती कशी करावी?

''मागील वर्षीचा अनुभव पाहता यावर्षी आम्ही बी-बियाणे लवकर घेतले. परंतु, बियाण्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे बियाण्याचे भाव जास्त आणि उत्पन्न कमी असल्यामुळे शेती कशी करावी?, हे कळेनासे झाले आहे. त्यात निसर्गराजा जर रुसला अन् दुबार पेरणी करण्याची वेळ आली तर वर्ष कसे निघेल ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.'' - (सचिन साबळे​​​​​​, शेतकरी राजनापूर)

शासनाचा वचक असावा

''निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे कठीण झाले आहे. त्यातच खते व बियाण्याचे भाव कडाडले असून आमचे सोयाबीन 6000 रुपये क्विंटल भावाने बाजारात विकल्या जाते आणि बियाण्याचे दर मात्र दाम दुप्पट भावाने म्हणजे 12 हजार ते 14 हजार रुपये क्विंटल दराने मिळत आहे. यात मोठी तफावत आहे. शासनाने निर्बंध घालावे तेव्हाच आम्हाला शेती करणे परवडेल.'' - (रवींद्र राठोड, शेतकरी जामठी खुर्द)

बातम्या आणखी आहेत...