आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा प्रशासनाकडून घाेषणा:गणेशोत्सवातील चार दिवस ध्वनिक्षेपकाला मध्यरात्रीपर्यंत मुभा

अकाेला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी गणेशोत्सवात चार दिवस रात्री १२पर्यंत ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यास मुभा देण्याचा निर्णय बुधवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांच्या संयुक्त बैठकीत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला. बैठकीत विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही काही सूचना केल्या.

यंदा कोरोनाचे निर्बंध हटल्याने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व अन्य उत्सव उत्साहाने सादर करण्यात येत आहेत. दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर बुधवारी जिल्हा नियोजन भवनात ही बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,सहा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, डॉ. रामेश्वर पुरी, अभयसिंह मोहिते, महावितरण अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहा सराफ, अन्य विभागांचे प्रमुख अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष ॲड, मोतिसिंग मोहता, सचिव सिद्धार्थ शर्मा तसेच मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.गणेशोत्सवात सुधारणांना वाव असावा. शक्यतोवर पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

गणेशोत्सवातील या चार दिवसांत असेल मुभा
यंदाच्या गणेशोत्सवात चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. यात गणेशोत्सवाचा दुसरा दिवस(गुरुवार, १ सप्टेंबर), पाचवा दिवस(रविवार,४ सप्टेंबर), गौरी विसर्जन(सोमवार,५ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी (शुक्रवार ९ सप्टेंबर) हे चार दिवस ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यास रात्री १२ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

सुरक्षा आणि सामंजस्य हवे
यंदाचा गणेशोत्सव साजरा करतांना सद्भाव, सुरक्षा आणि परस्पर सामंजस्य जोपासून उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असा सूर बैठकीत उमटला. बैठकीत प्रारंभी विविध विभागांमार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती देण्यात आली. महानगरपालिकेने मंडळांना द्यावयाच्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करावी, मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजवावे. पोलीस विभागाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कार्यवाही करावी. गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्याबाबत नियमांचे पालन व्हावे. रात्री १० वा. नंतर ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक वापरता येणार नाही. तथापि, चार दिवस ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यास रात्री १२ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...