आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकालच शिंदे गटात गेलेले माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. अकोला येथे पत्रकार परिषदेत बाजोरिया म्हणाले, मी 30 वर्षे शिवसेनेत होतो. नगरसेवक आणि आमदार असताना आपल्यावर सातत्याने अन्याय झाला. मी मंत्रीपद कधी मागितले नव्हते. मात्र विधान परिषदेचे उपसभापतीपदाचा हट्ट उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला होता. त्यांनी उपसभापती पद देऊ केले होते. मात्र, नंतर उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला.
30 वर्षांत मला काय मिळाले
बाजोरिया यांच्यासह त्यांचे पुत्र आमदार विप्लव बाजोरिया आणि 26 पदाधिकाऱ्यांनी उद्धवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शुक्रवारी आमदार बाजोरिया यांनी त्यांच्यातील खदखद पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली. बाजोरिया म्हणाले की, मी शिवसेनेला दोन आमदारकी दिल्या. त्या बदल्यात मला काय मिळाले. ३० वर्ष आमदार असताना उपसभापती पदासाठी पक्षप्रमुखाकडे हट्ट धरला होता. त्यावर त्यांनी अडीच वर्षासाठी पद देण्याचे मान्य केले होते. मात्र, नंतर आपल्याला न देता महिला असल्याचे कारण समोर करून निलम गोऱ्हे यांना उपसभापती बनवले. उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द फिरवला.
मविआमुळे आमदारकी गेली
बाजोरिया म्हणाले, शिवसेनेकडे निवडून येण्याइतके मतदान नसताना आपण सलग पाच वेळा निवडून आलो. मुलगा विप्लव यास सुद्धा हिंगोली परभणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघातून निवडून आणले. यावेळी मात्र महाविकास आघाडीकडे 75 टक्के मतदार असतानाही आपला पराभव पक्षातीलच लोकांनी केला. याविषयी दाद मागितली असता न्याय मिळाला नाही. त्यामुळे दु:खद अंतकरणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झालो आहे. कोणत्याही अटी शर्थीशिवाय आपण प्रवेश केल्याचे बाजाेरिया म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.