आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यम प्रकल्प:वान प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले; तर काटेपूर्णा प्रकल्पाचे केले बंद

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील दुसऱ्या मोठ्या वान प्रकल्पाचे दोन दरवाजे २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता उघडण्यात आले आहेत. यातून ४२.१७ घनमीटर प्रतिसेकंद (४२ हजार १७० प्रतिसेकंद लिटर) विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी ६ वाजता आणखी दोन दरवाजे उघडून हा विसर्ग ८२.३४ घनमीटर प्रतिसेकंद (८२ हजार ३०० प्रतिसेंकद लिटर) करण्यात आला. दरम्यान जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन दरवाजे आज सकाळी ६ वाजता बंद करण्यात आले.

जिल्ह्यात वान प्रकल्प दुसरा मोठा प्रकल्प आहे. प्रकल्पाची साठवण क्षमता ८१.९५ दलघमी आहे. सातपुडा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने यावर्षी जुलै महिन्यात वान प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर काटेपूर्णा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले. आतापर्यंत वान प्रकल्पाचे अनेकदा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. यापूर्वी १८ ऑगस्ट रोजी प्रकल्पातील विसर्ग बंद करण्यात आला होता. तेव्हापासून प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आलेले नाही. मात्र २३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे ३० सेंमी.ने उघडण्यात आले, तर सायंकाळी ६ वाजता ४ दरवाजे उघडण्यात आले. तूर्तास प्रकल्पात ६७.१८ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.

प्रकल्पात येणारी पाण्याची आवक पाहून प्रकल्पाचे दरवाजे उघडणे अथवा बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी दिली. दरम्यान जिल्ह्यातील मोर्णा, निर्गुणा, उमा या मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे २२ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता दोन दरवाजे ३० सेंमी.ने उघडण्यात आले होते. यातून ५०.१६ घनमिटर प्रतिसेकंद (५० हजार १६० प्रतिसेंकद लिटर) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. हा विसर्ग २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता बंद करण्यात आला. दरम्यान काटेपूर्णा प्रकल्पातून ९ तासात १६२ कोटी ५१ लाख ८४ हजार लिटरचा पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...