आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालिम उपाय:एक एप्रिलपासून मालमत्ता‎ कराची वसुली ठेका पद्धतीने‎

श्रीकांत जोगळेकर । अकोला‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसुलात वाढ व्हावी, या हेतूने मनपा प्रशासन पुढील‎ आर्थिक वर्षापासून मालमत्ता कर वसुली ठेका पद्धतीने‎ देणार आहे. या अनुषंगाने निविदा तयार करण्याचे काम‎ सुरू आहे. वसुलीचे काम ठेका पद्धतीने देताना विविध‎ अटींचा या निविदेत समावेश करावा लागणार आहे.‎ ‎ मनपाला चालू आर्थिक वर्षात ८० कोटींची वसुली‎ करावी लागते. ही वसुली ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत‎ नाही. त्यामुळे थकीत मालमत्ता कराच्या रकमेत वाढ होते.‎ थकीत मालमत्ता करावर नियमानुसार दरमहा २ टक्के‎ व्याज आकारण्याचा अधिकार प्रशासनाला आहे.‎

मालमत्ताधारक थकीत कराचा भरणा करीत नसल्याने‎ अनेक वेळा अभय योजना राबवली. जेणे करुन मालमत्ता‎ धारकांना व्याजाचा भुर्दंड बसू नये. मात्र अभय योजना‎ राबवूनही थकीत मालमत्ता कराचा भरणा केला जात‎ नाही. परिणामी मालमत्ता करातून मनपाला कोट्यवधी‎ रुपये मिळतील, असा आकडा मात्र दिसतो. हे लक्षात‎ घेऊनच मनपा प्रशासनाने दैनंदिन बाजार वसुलीच्या‎ धर्तीवर मालमत्ता कर वसुली ठेका पद्धतीने देण्याचा‎ निर्णय घेतला आहे. मात्र दैनंदिन बाजार वसुलीचा ठेका‎ आणि मालमत्ता कर वसुलीचा ठेका, यात मोठी तफावत‎ अाहे. बाजार वसुलीचा ठेका देताना प्रशासन एक रक्कम‎ निश्चित करते. ही रक्कम कंत्राटादाराला मनपाला द्यावीच‎ लागते. त्यावर जमा झालेली रक्कम ही कंत्राटदाराची‎ असते. मात्र मालमत्ता कर वसुलीचे तसे नसल्याने‎ प्रशासन यावर काम करीत आहेत.

तर हा पहिलाच प्रयोग ठरणार‎
राज्यात आतापर्यंत लातूर येथे पाणीपट्टी वसुली ठेका‎ पद्धतीने देण्यात आली होती. मात्र मालमत्ता कर‎ वसुली ठेका पद्धतीने देण्याचे ऐकीवात नाही.‎ त्यामुळे अकोला महापालिकेने असे केल्यास हा‎ पहिलाच प्रयोग राहणार आहे.‎

अनेक बाबींचा करावा लागेल विचार ?‎
मालमत्ता कर वसुली कंत्राटदाराने केल्यानंतर त्याला‎ किती टक्क्यांनी वसुली देणार?‎ थकीत कराची वसुली करण्याचे अधिकार दिले‎ जाणार का?‎ कंत्राटदाराला कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्तेला‎ सील लावता येणार का?‎ कंत्राटदार वसुल केलेल्या कराची रक्कमेचा दररोज‎ भरणा करणार की आठवड्याचा भरणा करणार?‎ ८० कोटी रुपयांचा कर वसूल करावा लागणार‎ असल्याने कंत्राटदाराकडून बँक गॅरंटी किती कोटी‎ रुपयांची घेणार?‎ नव्याने बांधलेल्या मालमत्तेची मोजणी कंत्राटदार‎ करणार की मनपाचे कर्मचारी?‎ कंत्राटदार करणार असेल तर त्याला मालमत्ता‎ मोजणीचे शुल्क किती देणार?‎

कर विभागात कार्यरत कर्मचारी‎
मालमत्ता कर वसुलीसाठी मालमत्ता कर अधीक्षक, चार‎ सहाय्यक कर अधीक्षक तसेच ४८ कर वसुली लिपिक‎ आणि अन्य ३७ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी दर दोन‎ महिन्यांआड कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.‎

आतापर्यत ३१ कोटीचा कर वसूल : महापालिकेला चालु आर्थिक वर्षात ७९ कोटी ६२ लाख ३० हजार‎ १८२ रुपयांचा कर वसूल करावा लागणार होता. आर्थिक वर्ष संपुष्टात यायला आता केवळ १५ दिवस राहिले‎ असताना आतापर्यंत ३१ कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे.‎

बारीक-सारीक मुद्यावर विचार मंथन सुरू‎
मालमत्ता कर वसुली ठेका पद्धतीने देणे, हे सोपे नसल्याने‎ प्रशासन कंत्राट दिल्यानंतर कोणतीही चूक राहू नये, याची‎ खबरदारी घेण्यासाठी बारीक-सारीक मुद्यावर मंथन‎ करीत आहे. या सर्व बाबींचा उल्लेख प्रसिद्ध केल्या‎ जाणाऱ्या निविदांमध्ये करावा लागणार आहे. एकही‎ महत्वाची बाब निविदेत समाविष्ट न केल्या गेल्यास पुढे‎ ही बाब महापालिकेला अडचणीची जाऊ शकते.‎ त्यामुळेच प्रशासनाकडून या निविदेवर काम सुरू आहे.‎

बातम्या आणखी आहेत...