आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये गडकरींचा कोंडतोय दम:नाना पटोलेंचा दावा, काँग्रेसमध्ये येण्याचे दिले आमंत्रण; म्हणाले- आमच्याकडे या, आम्ही साथ देऊ

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भाजपमध्ये कोंडी होत असल्याचे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसून येते. नितीन गडकरी यांनी काँग्रेसमध्ये यावे, त्यांचे आम्ही समर्थन करू, अशी ऑफर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गडकरी यांना दिली आहे. ते अकोल्यात शनिवारी माध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले म्हणाले की, नितीन गडकरी भाजपमध्ये नाराज आहेत. तेथे जी परिस्थिती आहे, ती ठीक नाही. आम्ही त्यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर देत आहोत. त्यांनी आमच्यासोबत यावे, आम्ही त्यांचे समर्थन करू. गडकरींनी आपल्याला भेटावे किंवा लवकरच आपण त्यांना भेटू. काँग्रेस एक लोकशाहीवादी पार्टी आहे. येथे प्रत्येकाला बोलण्याचा, मत मांडण्याचा अधिकार आहे. ज्या प्रमाणे नितीन गडकरी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका जाहीर करतात, त्यावरून भाजपमध्ये त्यांचा दम कोंडत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याचा विचार करावा.

पालकमंत्रीच नेमायचा नाही, ही लोकशाही न मानणारी भाजपची भूमिका : सरकार पडेल या भीतीने राज्य सरकार मंत्रिमंडळ विस्तार करीत नाही. जनतेचे नुकसान झाले तरी चालेल, पण सत्तेत बसून राज्य कसे विकता येईल, याच अजेंड्यावर राज्य सरकार काम करते आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारही करायचा नाही व पालकमंत्रीही नेमायचा नाही ही लोकशाहीला न मानणारी ही व्यवस्था आहे, असे पाटोले म्हणाले.

राहुल गांधीच पुन्हा अध्यक्ष व्हावे, ही देशभरातील काँग्रेसींची इच्छा आहे. सध्या देश संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये या देशाला संकटातून गांधी परिवारच वाचवू शकतो आणि देशाला उभे करण्याची क्षमता फक्त राहुल गांधी यांच्यामध्येच आहे. राहुल हे काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत, ही सगळ्या काँग्रेसची भूमिका आहे, असे पटोले म्हणाले.

टीशर्ट पेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला

राहुल गांधी यांनी ४१ हजार रुपयांचा टी-शर्ट घातला की चार हजारांचा? यापेक्षा महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपने बोलावे. देशामध्ये सत्तेमध्ये येत असताना त्यांनी त्याकाळी जी भूमिका मांडली होती आता त्याविरुद्ध काम करत आहेत. शेतकऱ्यांना लुटायचे काम भाजप करत आहेत, असेही पटोले म्हणाले.

जातीजातीमध्ये भांडण लावणे हा भाजपचा मुख्य धंदा

सर्व विकून देश चालवणाऱ्या लोकांना राहुल गांधींवर टीका करायचा अधिकार नाही. राहुल गांधींची पदयात्रा राजकीय उद्देशाने नाही. या देशातील तिरंग्याला वाचवण्याची आज गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मी माझे वडील गमावले आता माझा देश गमावू देणार नाही व म्हणून कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा सुरू केली. सगळ्या धर्मांच्या लोकांना जोडण्याचे काम गांधी करीत आहेत. जातीजातींमध्ये भांडणे लावणे हा भाजपच्या लोकांचा धंदा राहिला आहे, असे पटोले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...