आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२००८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या पतीचे निधन झाल्यानंतर पत्नीने अनुकंपातत्वावर नोकरी मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, वयाचे कारण सांगून तो फेटाळण्यात आला होता. मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतरही तिने अर्ज उशिरा केला म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने तोही अर्ज फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. खंडपीठाने मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिने जर एक वर्षाच्या आत अर्ज केला आहे तर नोकरीसाठी ती पात्र ठरते, असे मत नोंदवत सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा आठवड्याच्या आत कार्यवाही करावी, असा निर्णय दिला आहे. वैष्णवी मोहन देशमुख (मुलगी) व सुजाता मोहन देशमुख (पत्नी) असे याचिकाकर्तींचे नाव आहे.
याचिकाकर्तींनी प्रिन्सीपल सेक्रेटरी सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला व जिल्हाधिकारी अकोला यांच्याविरूद्ध याचिका दाखल केली होती. मोहन देशमुख हे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला असताना ७ ऑक्टोबर २००७ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने अनुकंपा तत्वावर नियुक्तीचा अर्ज २१ एप्रिल २००८ रोजी केला होता. मात्र, ४० वर्षे उलटल्याने वयोमर्यादेचा निकष लावत तो अर्ज १८ जुलै २००८ रोजी फेटाळण्यात आला. त्यावेळी वैष्णवी ही अल्पवयीन होती. वैष्णवी १७ वर्षाची असतानाच तिने १३ नोव्हेंबर २०१७ रोजी नियुक्तीसाठी अर्ज केला. मात्र अर्ज खूप उशिरा आला म्हणून अधिकाऱ्यांनी ५ ऑक्टोबर २०२० रोजी तिचा अर्ज नाकारला. व्यथित होवून अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देत याचिका दाखल करण्यात आली.
न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर व न्यायमूर्ती एम. डब्यू. चांदवाणी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली असता याचिकाकर्तींचे वकील अमित प्रसाद आणि सरकार पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने नमूद केले की, पत्नीने सुरुवातीला अर्ज केला होता मात्र तो वयात बसत नसल्याने फेटाळला होता. मात्र १३ नोव्हेंबर २०१७ रोजी मुलीने दाखल केलेला अर्ज हा सज्ञान झाल्यानंतरचा आहे. त्यामुळे २१ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार व त्यातील कलम (१०) नुसार मुलीला नोकरीचा अधिकार आहे. त्यानुसार निकालाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्याच्या कालावधीत मुलीच्या अर्जावर कार्यवाही करावी, असा आदेश खंडपीठाने दिला आहे. याचिकाकर्तींच्या बाजूने अॅड. अमित प्रसाद(नागपूर) व अॅड. राहूल इंगळे (अकोला) यांनी काम पाहिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.