आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनावर गंभीर आरोप:अकोल्याचे पोलिस, अन्न आणि औषध प्रशासन हफ्तेखोरीत दंग; पालकमंत्री कडू यांनी वेशांतर करून केले स्टिंग

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
पालकमंत्री बच्चू कडू यांनी ओळख लपवून विविध ठिकाणी जाऊन झाडाझडती घेतली. - Divya Marathi
पालकमंत्री बच्चू कडू यांनी ओळख लपवून विविध ठिकाणी जाऊन झाडाझडती घेतली.
  • गुटखा बंदी असतांनाही सर्रास विक्री; हप्तेखोरांवर लवकरच कारवाई करण्याचे संकेत

पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी जिल्ह्यात वेशांतर करून एन्ट्री करत स्टिंग ऑपरेशन केले. त्यानंतर त्यांनी पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभाग त्या लोकांकडून हफ्ते घेते असा, असा गंभीर आरोप पत्रकारांशी बोलताना केला. बच्चू कडू यांनी बँका, कृषी केंद्र, पुरवठा विभागाचे रेशन दुकान, तहसील आदी ठिकाणी वेशांतर करून शेख अब्दुल नाव धारण केले आणि झाडाझडती घेतली. त्यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यापासून स्टिंग ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर ते पातूर येथे गेले.

पातूरमध्ये त्यांनी बाळापूर रोडवरील कलश पान सेंटर व एस बी कन्फेशनरी या दुकानात जाऊन विमल, बहार, सितार आदी. गुटखा मिळतो का म्हणून विचारणा केली असता त्यांना गुटखा दिसून आला. त्यांनी अंदाजे २० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. हा गुटखा वाहनात घेऊन ते अकोल्यात आले असता त्यांनी चौकातील पोलिसांना माहिती दिली असता त्यांना ही हद्द जुने शहर पोलिसांची असल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर जुने शहर पोलिस आल्यानंतरही त्यांनी काहीच कारवाई केली नाही.

अकोल्यात पोलिस आणि अन्न आणि औषध प्रशासन या लोकांकडून हफ्ते घेत असल्याचा स्पष्ट आरोप त्यांनी केला. याप्रकरणी लवकरच ठोस कारवाई करण्याचे संकेत बच्चू कडूंनी दिले. तसेच त्यांना अनेक ठिकाणी चांगले अनुभवही आल्याचे त्यांनी सांगितले. कोकण ग्रामीण बँकेत त्यांनी पीक कर्जासाठी १५-२० हजार रुपये देऊ केले मात्र पैशाची गरजच नाही असे बँकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच रेशन दुकानात तांदूळ मागितला असता देताच येत नाही, असे चांगले अनुभवही आल्याचे पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले.

मग गुटखा बंदी कशाला
गुटखा बंदी असताना गुटखा सर्रास मिळतो. हाच गुटखा पोलिसांना दाखवल्यावरही त्यांना कोणतेही गांभीर्य असल्याचे दिसून आले नाही. पोलिसांना हाती गुटखा घेऊन दाखवला मात्र काहीच कारवाई नाही, याचा अर्थ पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे. असे असेल तर गुटखा बंदी हवीच कशाला, असा सवालही त्यांनी यावेळी करत पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाविषयी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

आपण लोकशाहीत राहतो का असा मनपात अनुभव!
पालकमंत्री बच्चू कडू हे महापालिकेत गेले. तेथे त्यांनी आयुक्तांना भेटायचे आहे, असे म्हटले असता टॅक्स पावती असेल तरच भेटता येईल अन्यथा नाही, तुम्ही चार वाजता टॅक्स पावती घेऊन या व भेटा, असे सुरक्षा रक्षकाने त्यांना सांगितले. त्यावरून खरोखर आपण लोकशाहीत राहतो का, असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. वेशांतर करून गेल्याने महापालिकेत ही त्यांना कुणी ओळखले नाही.

स्टिंग हे दिखावा नाही
दिखावा म्हणून स्टिंग ऑपरेशन नाही तर बेकायदेशीर कामे होऊ नये, यासाठी आपण आज वेशांतर केले. सरकारी यंत्रणेने कार्यक्षम राहून प्रामाणिक काम करावे, हाच यामागील आपला हेतू होता. यापुढे याच पद्धतीने ओळख लपवून विविध शासकीय कार्यालये आणि ठिकाणांची पाहणी करून यंत्रणेला वठणीवर आणू, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...