आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Guidance On Fertilizer Use And Gardening; Fertilizer Distribution To 22 Cotton Producing Tribal Farmers Of Wari Hanuman| Marathi News

दिव्य मराठी विशेष:खतांचा वापर आणि परसबागेबाबत मार्गदर्शन; वारी हनुमान येथील २२ कपाशी उत्पादक आदिवासी शेतकऱ्यांना खत वाटप

अकोला25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातील सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये प्रकल्प अंतर्गत अकोला जिल्ह्यातील वारी हनुमान येथील एकूण २२ कपाशी उत्पादक आदिवासी शेतकरी तसेच चार सोयाबीन उत्पादक आदिवासी शेतकरी यांना प्रथमरेषीय प्रात्यक्षिक अंतर्गत द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त पीडीकेव्ही ग्रेड ११ व पीडीकेव्ही ग्रेड दहा या खताचे वाटप व त्यांच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनात मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजय भोयर यांनी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी अंतर्गत वारी हनुमान येथे कापूस व सोयाबीन उत्पादक आदिवासी शेतकऱ्यांकरिता सदर एकदिवसीय शेती दिन तथा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला.या वेळी विद्यापीठाचे मिरची व भाजीपाला संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. श्याम घावडे यांनी परसबागेच्या उपयुक्ततेबाबत उपस्थित शेतकरी बंधू व भगिनींना माहिती दिली व परसबागेत भाजीपाला लागवड केल्याने खर्चात बचत होऊन उत्पन्नात कशी वाढ होते व त्यामुळे आपल्या जीवनमानातही कसा बदल होतो याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.

सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये योजनेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संदीप हाडोळे यांनी कृषी विद्यापीठ निर्मित द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त पीडीकेव्ही मायक्रो ग्रेड दोन, दहा तसेच अकरा या खतांबाबत तसेच त्यांच्या विविध पिकावरील वापराबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी २६ शेतकऱ्यांचे मातीचे नमुने गोळ्या करण्यात आले असून त्यांचे पृथक्करण करून सर्वांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सूक्ष्म अन्नद्रव्ये योजनेचे कनिष्ठ मृदा शास्त्रज्ञ प्रशांत सरप यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रेमलाल बिलावेकर, नंदू तोटे, सरपंच शिवाजी पतंगे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...