आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा:‘गुंठेवारी’ निकाली; हद्दवाढीतील बांधकामाचा प्रश्न अद्याप कायम

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुंठेवारीचे नियमानुकूल करण्याचे काम ऑफलाइन पद्धतीने सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत ४०२ गुंठेवारीची प्रकरणे दाखल झाली असून, त्यात ११७ आवास योजनेतील आहे. तर २८५ अन्य प्रकरणे आहेत. त्यामुळे शहरातील विशेषत: हद्दवाढ भागातील गुंठेवारी प्लॉटचा प्रश्न निकाली निघाला आहे. मात्र हद्दवाढ भागातील वाढीव बांधकामाचा प्रश्न अद्याप जैसे-थे आहे. तत्कालीन प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी हद्दवाढ भागातील बांधकामे अवैध ठरवली होती.

महापालिकेची हद्दवाढ ऑगस्ट २०१६ ला झाली. या हद्दवाढीत २४ गावे महापालिकेत समाविष्ट झाली. त्यापूर्वी ही गावे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत होती. ग्रामपंचायत क्षेत्रात बांधकाम करायचे असेल तर बांधकामाचा नकाशा मंजूर करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगररचना विभागाला असतात. मात्र याबाबत सुशिक्षित नागरिकही अनभिज्ञ राहिले. त्यामुळे बोटावर मोजण्याइतके बांधकाम वगळल्यास इतर सर्वच बांधकामांना ग्रामपंचायतीने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. या ना-हरकत प्रमाणपत्राला मंजुरी समजून हजारो इमारती उभ्या राहिल्या. हद्दवाढ भागात जवळपास ४८ हजार मालमत्ता आहेत. मात्र हद्दवाढ झाल्यानंतर आता नकाशा मंजुरीचे काम महापालिकेकडे आहेत. त्यामुळेच हद्दवाढ भागातील रहिवाशांना वाढीव बांधकामाचा नकाशा मंजुर करताना अस्तित्वात असलेल्या इमारतीचा मंजूर नकाशा दाखवणे आवश्यक ठरले आहे. मात्र नकाशाच मंजुर नसल्याने नकाशा नगररचना विभागाला देत येत नाही.

परिणामी वाढीव बांधकामाचा नकाशाही मंजूर केला जात नाही. अशा बिकट परिस्थितीत हद्दवाढ भागातील नागरिक अडकले आहे. यावर महापालिकेने अद्यापही धोरणात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे हद्दवाढ भागातून निवडून आलेल्या नगरसेवकांना िनवडणुकीत नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान महापालिकेत तूर्तास प्रशासक आहेत. प्रशासकांना सर्वसाधारण सभेचे अधिकार आहेत. त्यामुळे प्रशासक तथा आयुक्त कविता द्विवेदी या गंभीर बाबीकडे लक्ष देतील का? अशी चर्चा या निमित्ताने सुरु आहे.

‘गुंठेवारी’प्रमाणे निर्णय घ्यावा गुंठेवारीचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र हद्दवाढ भागातील बांधकामाचा निर्णय महापालिकेला घेणे शक्य आहे. हद्दवाढ भागातील बांधकामाचा निर्णय महापालिकेने घेवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी हद्दवाढ भागातील नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...