आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधारात फिरायचा अन् डोळ्यात धुळ फेकायचा:अलीशान गाडीतून गुटख्याची तस्करीचा प्रयत्न उधळला; 2.20 लाखांचा माल जप्त

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अलीशान गाडीतून अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करीत गुटख्याची तस्करी करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. तब्बल दोन लाख 20 हजारांचा गुटखा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केला. हि कारवाई मध्यरात्रीनंतर पोलिसांनी केली.

मध्यरात्रीनंतर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील कार्यरत विशेष पथकाला माहिती मिळाली की, एका चारचाकी गाडीत खामगावकडून अकोला शहरात प्रतिबंधित गुटखा आणला जात आहे. त्यावरून वाशीम बायपास येथील समीर गॅरेज समोर नाकाबंदी करून गाडीची तपासणी केली. त्यात (एम. एच. 30 बी. बी. 5489) या गाडीतून गुटखा तस्करी होत असल्याचे आढळून आले. दोन संशयित व्यक्तींकडून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी नेला जात होता.

आरोपी जोहेल अहमद जमील अहमद उर्फ बॉबी (33, रा. फतेहचौक), मोहमद इरफान मोहमद यूनुस (33, रा. यूसुफ अली खदान) या दोघांकडे गाडीत 10 पोते महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. ज्याचे बाजारमूल्य दोन लाख 20 हजार रुपये आहे. याशिवाय 20 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, आठ लाखांची चारचाकी गाडी, असा एकूण 10 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दोन्ही आरोपीविरुद्ध जुने शहर पोलिस स्टेशन येथे भादंवी कलम 328 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.

गुटख्याची सर्रास विक्री

जिल्ह्यामध्ये गुटख्याची सर्रास विक्री सुरु आहे. दोन महिन्यापूर्वी विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या होत्या. काही गुटखा माफियांवर हद्दपारीच्या कारवायासुद्धा करण्यात आल्या आहेत. असे असताना आता गुटखा माफियांनी गुटख्याची तस्करीचे मार्ग बदलल्याचे कारवाईवरून समोर आले आहे. असे असताना जिल्ह्यात अनेक ठिकाणी सर्रास गुटखा मिळत आहे. हा गुटखा कुठून येतो, तो कोण देतो, याचा तपास होण्याची गरज आहे. आज जप्त करण्यात आलेला गुटखाकुणाच्या सांगण्यावरून अकोल्यात आणला जात होता? त्याचा मालक कोण? याचा शोध घेणे पोलिसांसमाेर आव्हान आहे.

बातम्या आणखी आहेत...