आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात पावसाची संततधार:शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; पावसाने काढणीला आलेल्या पिकांचेही नुकसान

अकोला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी, 11 सप्टेंबरला संध्याकाळी वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह संततधार पाऊस झाला. शहारात झालेल्या पावसाने अनेक भागात काढणीला आलेल्या मुगाचे देखील नुकसान झाले आहे.

पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

शनिवारी रात्री जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली. तर काढणीला आलेल्या पिकांचेही नुकसान झाले. बोरगाव मंजू परिसरात गारांसह पावसाने हजेरी लावली होती. रविवारी दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रात्री पुन्हा विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अनेक भागात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे उदीड -मूग उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर सप्टेंबरमध्येही वादळी पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना तडाखा बसला आहे.

शनिवारी रात्रीच्या वादळी पावसामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील उमरी अरब परिसरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली. विद्युत वाहिन्या तुटल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. जवळपास अर्धा तास वादळ सुरू होते. या वादळाने किनखेड (कामठा) गाव व परिसरात अनेक झाडे जमीनदोस्त झाली. तर झाडे पडल्याने विद्युत वाहिन्या देखील तुटून पडल्या.

बाळापूर तालुक्यात पिकांना पुन्हा फटका

बाळापूर तालुक्यात शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे मुगासह अन्य पिकांना फटका बसला आहे. कवठा, निंबा, लोहारा, हातरूण, निमकर्दा, दुधाळा, मंडळा, मालवाडा, लोणाग्रा, हातला, शिंगोली आदी भागात पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी वृक्षही उन्मळून पडली. पाणी साचल्याने आता काही दिवस कामासाठीही शेतात जाणे शक्य नाही. आधीच जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीमुळे बाळापूर तालुक्यात शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. आता सप्टेंबर महिन्यातही शेतीचे नुकसान होणे सुरूच आहे. त्यामुळे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...