आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:जिल्ह्यातील 20 हजार महिलांमध्ये आढळली उच्च रक्तदाबाची समस्या

अकोला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानात आतापर्यंत ३ लाख ८१ हजार १६४ महिलांच्या तपासण्या झाल्या आहेत. त्यामध्ये २० हजार १०३ महिलांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या आढळून आली. आतापर्यंत झालेल्या तपासण्यांमध्ये ५.२७ टक्के महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला आहे.

नवरात्राेत्सवाच्या पार्श्वभूमीवर २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत माता सुरक्षित, तर घर सुरक्षित अभियानाअंतर्गत महिलांच्या तपासण्यांना सुरुवात केली होती. पुढे या मोहिमेची मुदत वाढवून १५ नोव्हेंबरपर्यंत केली. यामध्ये प्रामुख्याने १८ वर्षांवरील महिलांमध्ये रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, वजन-उंची आदी तपासण्या करण्यात आल्या. तपासण्यांमध्ये तरुणींचे प्रमाण अधिक आहे. असे असले तरी ५.२७ टक्के महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला. याशिवाय रक्ताक्षय, वजन कमी, मधुमेह आदी तक्रारीही आढळून आल्यात. जिल्ह्यातील २० हजार महिलांमध्ये आढळली उच्च रक्तदाबाची समस्या
.....................
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी : वजन नियंत्रित ठेवा, स्थूल असल्यास वजन कमी करण्यावर भर द्या, खाताना-पिताना गरजेपुरते मीठ घ्या, मिठाचे अतिरिक्त सेवन टाळा, हिरव्या भाज्या, हंगामी फळे, कडधान्ये आहारात घ्या, नियमित किमान ४५ मिनिटे व्यायाम करा, चहा-कॉफी टाळा, रक्तदाबाची वेळोवेळी तपासणी करा, कोणतेही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ही आहेत लक्षणे : वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, उच्च रक्तदाबाची प्रमुख ९ लक्षणे आहेत. त्यामध्ये नाकातून रक्त वाहने, डोके दुखणे, छातीत दुखणे, लघवीतून रक्त जाणे, धाप लागणे, मळमळ आणि उलट्या, छातीत धडधडणे, चक्कर येणे, अंधूक दिसणे आदी लक्षणांचा समावेश आहे.

रक्तदाबाची कारणे
अनेकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या ही आनुवंशिक असू शकते.त्यसोबतच मद्यपान, मिठाचे जास्त प्रमाणात सेवन करणे. जेवण करून आराम करणे किंवा एकाच ठिकाणी बसून काम करणे.

निम्म्या तपासण्या अद्याप बाकीच
जिल्ह्यात आतापर्यंत अडीच लाख महिलांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या आहेत. निम्म्या तपासण्या बाकी आहेत. आतापर्यंत १९ हजार महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळला आहे. डॉ. विनोद करंजीकर, माता व बाल संगोपन अधिकारी, अकोला.

आतापर्यंत झालेल्या तपासण्या : अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ८१ हजार १६४ महिलांची या मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली. यातील १ लाख ३१ हजार १६४ महिला या अकोला मनपा हद्दीतील आहेत. तर उर्वरित अडीच लाख महिला या जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यात अद्याप तपासणीचे निम्मे उद्दिष्ट बाकी आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. त्यामुळे तारीख वाढवून मिळू शकते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...