आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी पावसाचा दणका:अकोल्यात केळी पिकाला फटका; तेल्हारा तालुक्यातील शेकडो एकरांवरील बागा भुईसपाट

अकोला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या वादळी पावसामुळे अनेक भागातील फळबागांचे नुकसान झाले आहे. विशेष करून तेल्हारा तालुक्यातील फळबागांना वादळी पावसाचा फटका बसला आहे. हिवरखेड पंचक्रोशीतील केळीची पिके भुईसपाट झाली आहे. शेकडो एकरवरील पिकांची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात 9 जूनला रात्री अकरानंतर मध्यरात्री उशीरापर्यंत विजांचा लखलखाट आणि वादळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, दानापूर, सौंदळा, कारला, सोनवाडी, हिंगणी, वारखेड, झरी आदी गावांमधील केळीची पिके भुईसपाट झाली आहेत. याशिवाय विविध मार्गांवर झाडे उन्मळून पडली आहेत. हिवरखेड-सोनाळा राज्यमार्ग, दानापूर- सौंदळा यासह विविध मार्गांवर व शेतशिवारांमध्ये झाडे मुळासकट उन्मळून पडली आहे.

काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्याची लाखमोलाची पिके मातीत गेल्याने कृषी विभागाने तत्काळ नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

वादळ वाऱ्याची शक्यता

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार 11 जून रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळ वारा राहणार आहे. वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रतीतास राहण्याची शक्यता आहे. 12 ते 14 जून दरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पशुधन जपा

पुढील काही दिवस विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता असल्याने जनावरांना बाहेर चरण्यास पाठवू नये. गोठ्याची दुरुस्ती करावी, दुर्घटनांमुळे जनावरांची जीवीत हानी होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विद्यापीठाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...