आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हनीट्रॅप:युवती म्हणाली तुमचा ‘डीपी’ खूपच छान, तुम्हाला भेटायचे आहे; एका फोनवर ते गेले एका फ्लॅटमध्ये, जबरदस्ती काढले कपडे!

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युवतीच्या एका फोनवर ते गेले एका फ्लॅटमध्ये, जबरदस्ती काढले कपडे!

‘चुकून मॅसेज आला, तुमचा डीपी खूपच छान आहे, मला तुम्हाला भेटायचे आहे’, असे बोलणाऱ्या युवतीच्या मोह जाळ्यात सराफा व्यावसायिक आले. ते तिला भेटायला वैभव हॉटेलसमोर गेले. मात्र तेथून ती त्यांना एका फ्लॅटमध्ये घेवून गेली. तेथे तिच्या सहकाऱ्यांनी जबरदस्तीने सराफा व्यावसायिकाचे कपडे काढले आणि फोटो घेतले व ब्लॅकमेल करून पाच लाख रुपयांनी लुटले. हनी ट्रॅपमधील या लुटारू टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. त्यानंतर आणखी एका सरकारी नोकरदारासोबतही हाच किस्सा घडल्याचे समोर आले. आणखी किती जण हनीट्रॅपचे बळी ठरले याचा तपास पोलिस करीत आहेत.

सराफा व्यावसायिक राजकुमार वर्मा यांच्यासोबत हा बाका प्रसंग घडला. त्यांनी दिलेल्या एफआयआरमध्ये म्हटले की, ‘ रात्री साडेदहा वाजता जेवण झाल्यानंतर फिरत असताना मोबाइलवर अनोळखी नंबरवरून व्हॉटसअॅपवर हाय हॅलो असा मॅसेज आला. नंतर नंबर कुणाचा म्हणून फोन केला असता, समोरून एक युवती बोलली. चुकीने मॅसेज आला. मात्र, तुमचा व्हॉटसअॅपवरील डीपी खूप आवडला. मला तुम्हाला भेटायचे आहे, असे म्हणाली.

पुन्हा दुसऱ्या दिवशी वर्मा दुकानात असताना साडेअकरा वाजता पुन्हा युवतीचा फोन आला व वैभव हॉटेलसमोर भेटायला या, त्यानंतर वर्मा तिला भेटायला वैभव हॉटेलसमोर गेले असता ती भेटली. भावाचा फ्लॅट मलकापूरमध्ये आहे. भाऊ घरी नाही, आपण तेथे जावून बोलू असे युवतीने म्हटल्यानंतर तिची एक सहकारी पुढे आणि तिच्या पाठोपाठ वर्मा स्कूटीवरून हायवेच्या बाजूला एका चौथ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये पोहचले. काही वेळातच तिघे जण आले आणि आम्ही पोलिस आहोत, तुम्ही काय करता म्हणून त्यांना धाकदडप केली व वर्मा यांना जबरदस्ती कपडे काढायला लावले आणि त्यांचे फोटो घेतले व सामाजिक बदनामी थांबवायची असेल तर दहा लाख रुपये लागतील असे म्हणून ब्लॅकमेल करणे सुरु केले. पाच लाख देण्यावर प्रकरण थांबले. त्यानंतर वर्मा यांनी मित्रांकडून आणि घरून असे चार लाख ८५ हजार रुपये दिले. त्यांनी हा प्रसंग मित्रांना सांगितल्यानंतर मित्रांनी त्यांना धीर देत खदान पोलिस ठाण्यात नेले आणि तेथे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर संतोष उर्फ भैय्या जगदीश यादव रा. कौलखेड, राहुल रमेश इंगळे रा. कमला नेहरू नगर अनिकट, अक्षय सुनील चिरावांडे रा.कैलास टेकडी, प्रीती यांना अटक केली व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही तेजराव जगदेव नवलकार यांच्यासोबत ब्लॅकमेलिंगचा असाच प्रकार घडल्याने गुन्हा दाखल केला. शहरात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सतर्क राहणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...