आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या वर राहत असल्याने अकोलेकर हैराण झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे बाजारपेठ वगळता दुपारी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तर शेतशिवारांमध्येही सकाळी ११ पर्यंत महत्त्वाची कामे आटोपण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे.
जिल्ह्यात यंदा १५ मार्चपासून तीव्र उन्हाळ्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ४१.१ ते ४२.९ अंशांपर्यंत तापमान होते. अखेरच्या आठवड्यात ४३.२ अंशांपर्यंत तापमान झाले होते. एप्रिलमध्ये तापमानात सलग वाढ होत असून, रविवार ३ एप्रिलपासून पारा ४४ अंशांवर राहत आहे. हवामान अभ्यासकांनी मराठवाडा ते अंतर्गत तमिळनाडूपर्यंत कमी दाबाची द्रोणिय स्थिती तसेच मंगळवार ५ व बुधवार ६ एप्रिलला उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली होती. बुधवारी अकोला सर्वाधिक ४४ तर अमरावती जिल्ह्याचे तापमान ४३.२ होते. गुरुवारी गुरुवारी ७ एप्रिलला बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवार १२ एप्रिलपर्यंत विदर्भात सर्वसाधारणपणे कोरडे वातावरण राहणार असून, आणखी दोन दिवस कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही, असे अभ्यासक प्रा. अनिल बंड यांनी सांगितले.
शहरातील बाजारपेठ वगळता दुपारी रस्ते होताहेत निर्मनुष्य
कृषितज्ज्ञ सांगतात
शेतकरी, शेतमजुरांनी सूर्यप्रकाश टाळावा. सुती कपडे घालावे. शेतीची कामे करताना डोक्याचा भाग झाकावा. उष्णतेच्या लाटेत शरीराचे तापमान राखण्यास पाणी प्यावे. ऊन्हाळी पिके, भाजीपाला, फळबागांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी पहाटे किंवा सायंकाळी ओलीत द्यावे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांचा सामान्यांना सल्ला
नागरिकांनी दैनंदिन कामे उन्हाच्या आधी आटोपावी, तीव्र उन्हात बाहेर पडताना कापडाने अंग पूर्ण झाकलेले असावे, सलग उन्हात प्रवास करणे टाळा, भरपूर पाणी प्या. बालके आणि ज्येष्ठांचा उन्ह, उष्ण हवेपासून बचाव करा. महिलांनी सकाळी लवकर स्वयंपाक आटोपावा. चक्कर, उलटी, मळमळ, ताप आदी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.
दोन केंद्रांच्या नोंदीत तफावत : प्रादेशिक हवामान विभागाच्या वेधशाळेने बुधवारी, ६ एप्रिलला ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. तर कृषी विद्यापीठातील वेधशाळेने ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली. शहरातील दोन केंद्रांच्या तापमानात ०.८ अंशांची तफावत आढळली. कृषी विद्यापीठ क्षेत्रात वेधशाळा परिसरातील जंगल क्षेत्र,शेतशिवारामुळे येथील तापमानात घट असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.