आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिलेक्टिव्ह महिलांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आणि बाकीच्या महिलांचा अपमान म्हणजे अपमान नाही का, इतर महिला काय रस्त्यावर पडल्यात, असा सवाल भाजपच्या महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. प्रत्येकाने बोलताना भान ठेवले पाहिजे. तुमच्या कार्यकाळात काय उजेड पाडला ते सुद्धा बघणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही बोलता म्हणून आम्हाला आठवण करून द्यावी लागते. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील वादावर बोलताना ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही अकोल्यात मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाल्या.चित्रा वाघ म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारमध्ये महिलांचा सन्मान कुठे होता. महिला सरकार विरोधात बोलली म्हणून तिच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. कंगना राणावत बोलली म्हणून तिचे घर तोडले आणि शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले होते की ‘उखाड के फेक दिया’ तिला हरामखोरही म्हटले होते, हा महिलांचा सन्मान होता का. तेव्हा ताई सरकारमध्ये नव्हत्या का, असा सवाल उपस्थित करून त्यांनी राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी का केली नाही. आताच का महिलांचा मान, अपमान आठवला, असेही चित्रा वाघ म्हणाल्या. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, माजी महापौर अर्चना मसने, जयंत मसने उपस्थित होते.मंत्री असो वा नसो मला फरक पडत नाही : संजय राठोड यांचा राज्य मंत्रिमंडळातील प्रवेश आणि पूजा चव्हाण प्रकरणी चित्रा वाघ म्हणाल्या की, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आपण याचिका दाखल केलेली आहे. क्लीनचिट ही महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेली आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. माझा जो लढा आहे त्यात पूर्णपणे यश मिळेल. समोरचा माणूस मंत्री असो वा नसो मला काहीही फरक पडत नाही. माझी लढाई सुरू आहे. मी माघार घेतली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.