आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रतिनिधी:पॅसेंजर गाड्या नियमित सुरू होण्यास आणखी किती प्रतीक्षा ; लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाच्या अधिनस्त मूर्तिजापूर ते बडनेरा दरम्यान येणाऱ्या मूर्तिजापूरसह माना, कुरुम, टाकळी रेल्वे स्टेशनवरील प्रवासी, विद्यार्थी वर्ग बंद पॅसेंजर नियमित सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. पॅसेंजरसाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार ?अशा विवंचनेत विद्यार्थी सापडल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे संकट लॉकडाऊन लागला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मेल, एक्सप्रेस त्यासह पॅसेंजर गाड्या पाठोपाठ बंद केल्या. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर मेल, एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्या. त्यानंतर कित्येक दिवसांनी या मार्गावर एक मेमो पॅसेंजर गाडी सुरू केलेली आहे. या गाडीला डब्यांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो. मेमो गाडीच्या डब्याच्या संख्येत रेल्वे विभाग वाढ का करत नाही ? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. इतर पॅसेंजर गाड्या बंदच आहेत. या मार्गावरून भुसावळ ते बडनेरा, नागपूर दरम्यान तीन ते चार पॅसेंजर गाड्या धावत होत्या. परंतु या गाड्या अद्यापही बंद असल्याने त्या कधी सुरू होतील याची प्रतीक्षा प्रवासी वर्ग आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्ग आतुरतेने करीत आहे. पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये जनरल डब्यांची संख्या कमी असल्याने लोकांचा ओढा एस.टी.बसेस कडे वाढला आहे. त्यातच एस.टी.बसेसच्या संख्या देखील मर्यादित असून नाईलाजाने नागरिकांना खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. खाजगी वाहने देखील क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक करीत असल्याने अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जीव धोक्यात घालून जनतेला या चक्रामुळे प्रवास करावा लागत आहे. या सर्व घटनाक्रमांकडे गांभीर्याने लक्ष देऊन रेल्वे विभागाने पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, एक्सप्रेस गाड्यांमध्ये लग्नसराई, उन्हाळ्यातील सुट्ट्यांत वाढणारी प्रवाशांची संख्या पाहता जनरल डब्यांची संख्या देखील वाढवावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

नागरिकांची गैरसोय; रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज प्रत्येक ग्रामीण रेल्वे स्टेशनलाला ८ ते १० गावे जोडलेली आहेत. यातील काही गावे अशी आहेत की त्या गावांमध्ये एस.टी. बस अद्यापही जात नाही. त्यांना फक्त पॅसेंजर गाडीचा आधार आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असलेल्या कुरुम रेल्वे स्टेशनवर सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी नागपूर-भुसावळ पॅसेंजर त्यानंतर सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी भुसावळ वरून नरखेड जाणारी मेमो गाडी. ही गाडी पुन्हा दुपारी १ वाजून ४५ मिनटांनी परत या रेल्वे स्टेशनवर येऊन जात होती. त्यानंतर सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी भुसावळ वरून वर्धा जाणारी पॅसेंजर गाडी येत होती. तर रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी भुसावळ वरून नागपूरला जाणारी पॅसेंजर गाडी या रेल्वे स्टेशनवर येत असल्याने सर्व ग्रामीण भागातील जनतेला अकोला मुर्तीजापुर येथून आपले कामे आटोपून घरी परतण्यासाठी सोयीची होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे वर्धा वरून भुसावळला जाणारी पॅसेंजर असल्याने व्यवसायिक तसेच चाकरमान्यांना खूप सोयीचे होत होते.

बातम्या आणखी आहेत...