आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिल्क बँक:ह्यूमन मिल्क बँक रोज आठ बाळांना देतेय आईच्या दुधाची शक्ती

महेश घोराळे । अकोला3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा स्त्री रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालयातील दोन ह्यूमन मिल्क बँकेतून दरराेज सरासरी आठ ते दहा नवजात शिशुंना आईच्या दुधाची शक्ती मिळत आहे. कमी दिवस, कमी वजनाच्या बाळांसाठी या मिल्क बँक वरदान ठरत आहेत.

कुपोषण कमी करणे, बालमृत्यू रोखणे या उद्देशाने ह्युमन मिल्क बँक सुरू केल्या. वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचार मधील मिल्क बँक तीन वर्षांपासून सुरू आहे. स्त्री रुग्णालयातील ह्युमन मिल्क बँकेला एक वर्ष झाले. कमी दिवसाचे, कमी वजनाचे बाळ, माता मृत्यू, आईने सोडलेले बाळ अशा काळात ह्यूमन मिल्क बँक बालकांना आईच्या दुधाचा गोडवा पुरवते. जिल्हा स्त्री रुग्णालयात दरराेज सरासरी तीन,सर्वोपचार रुग्णालयाने दरराेज सरासरी पाच अशा सुमारे आठ बालकांची भूक ह्यूमन मिल्क बँकेद्वारे भागत आहे. रक्ताच्या चार चाचण्यांनंतर दूध डोनेट केले जाते. त्यात एचआयव्ही, एचबीएसएजी एचसीव्ही व्हीडीआरएलचा समावेश आहे.

अशी आहे प्रक्रिया
महिलेच्या स्वेच्छेने मिल्क डोनेशन केले जाते.
त्यासाठी रक्ताच्या चार चाचण्या करण्यात येतात.
१२ मुद्द्यांवर आईची विचारणा करण्यात येते.
माता पात्र असल्यास डोनेशन करून घेतले जाते.
शिशुला दूध देण्यापूर्वी ते पाश्चराईज्ड केले जाते.
दुधाची प्रयोगशाळेतून मायक्रो बायोलॉजिकल चाचणी होते.
डीप फ्रिझरमध्ये उणे २० तापमानात साठवणूक केली जाते.
शिशुला दूध देण्यापूर्वी सामान्य तापमानात आणले जाते.

मिल्क डोनेशन कोणाकडून?
बाळाची भूक होऊन अंगावर दूध शिल्लक असलेल्या मातेकडून.
बाळ नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) असल्यास किंवा दूध पिऊ शकत नसल्यास.

६ महिने टिकून राहू शकते दूध
गरजेनुसार फ्रिझ आणि डीप फ्रिझरमध्ये दूधाची साठवणूक केली जाते. उणे २० तापमानात हे दूध ठेवले जाते. पाश्चराईज्ड दूध सहा महिने टिकून राहू शकते. मात्र डोनेशन आणि गरज लक्षात घेता आपल्या येथे एवढा कालावधी साठवणुकीची गरज भासत नाही. रुम टेम्परेचरमध्ये आलेले दूध शिशुला दिले जाते.

शिशु मृत्युदर रोखण्यात मोलाचा वाटा
शिशुंची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासह मृत्यूदर रोखण्यात आईच्या दूधाचा मोठा वाटा आहे. मात्र कमी दिवसाच्या, कमी वजनाच्या किंवा अती धोका असलेल्या अनेक शिशुंना आईपासून दूर नवजात शिशु दक्षता कक्षात राहावे लागते. अशा बाळांसाठी आईचे दूध महत्त्वाचे ठरते. संकटाच्या काळात ह्यूमन मिल्क बँकेत वरदान ठरत आहे. गरजेनुसार मातांकडून डोनेट केले जाते. - डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय.

बातम्या आणखी आहेत...