आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​महापालिका:मी माझे कर्तव्य बजावले; आता तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा ः मनपा आयुक्त

अकोला17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मी फार मोठे काही केले नाही. मी माझे कर्तव्य बजावले. मात्र आता तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. उशिरा येणे, फाइल्स दडवून ठेवणे, कर्तव्यात कसूर करणे, हा सगळा प्रकार आता बंद करा. एखादवेळी झाडाझडतीत असा प्रकार आढळून आल्यास मी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करेन,’ अशा शब्दात मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी कर्मचाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. निमित्त होते, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्या बद्दल आयुक्तांचे आभार मानायला गेलेल्या प्रसंगाचे. या प्रकारामुळे आभार मानायला आलेल्या कर्मचाऱ्यांचे चेहरे मात्र पडले हाेते.

आयुक्त कविता द्विवेदी यांनी मनपाचे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ जुळवून आणला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना गेल्या सव्वा वर्षांपासून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला वेतन दिले जाते. दरम्यान एकीकडे वेतनाची गाडी रुळावर आणताना दुसरीकडे सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याचे वेतन देताना पाच हजार रुपये जमा केले जातात. तर रजारोखीकरण, महागाई भत्ता आदी सर्व प्रकारची देणी आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन मिळावे, यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला. महासभेने हा प्रस्ताव मंजुर केल्यानंतर आयुक्तांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

अखेर राज्य शासनाने महापालिकेला सातवा वेतन आयोग लागू करण्याची मंजुरी दिली. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. त्याच बरोबर आयुक्तांचे आभार मानले. मात्र सार्वजनिक सुटीमुळे आयुक्त महापालिकेत आल्या नव्हत्या. साेमवारी १२ सप्टेंबरला त्या कार्यालयात आल्यानंतर कर्मचारी पुष्पगुच्छ घेवून त्यांचे आभार मानायला गेले. आयुक्तांनी पुष्पगुच्छ स्वीकारले तसेच आभारही स्वीकारले. मात्र यावेळी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना कान पिचक्या दिल्या.

आयुक्त म्हणाल्या, मी नियमित वेळेवर कार्यालयात येते. तुमच्या पैकी किती जण नियमित वेळेवर कार्यालयात हजर असतात. जे काही वेळेवर येतात, ते नंतर चाट मारतात. विना कारण तुमच्या टेबलवर फाइल पडलेली असते. हा प्रकार सर्वथा चुकीचा आहे. तुम्हालाही तुमच्या कर्तव्याची जाणिव असणे आवश्यक आहे. मी सातवा वेतन लागू केला म्हणजे काय? तर मी देखिल माझे कर्तव्य केले. आता तुम्ही तुमचे कर्तव्य करा, म्हणजे खऱ्या अर्थाने मला आनंद होईल.

बातम्या आणखी आहेत...