आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधन:विहारांची विद्यापीठे झाल्यास सद्धम्म अंमलात येईल ; डॉ. आंबेडकर व्याख्यान मालेचा समारोप

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विहारं जरूर बांधा पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सद्धम्म स्वीकारायचा असेल तर विहारांची विद्यापीठं करा. तेथे कर्मकांडी व्यवस्था उभी करू नका तर तेथे ग्रंथालये उभी करा. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशी पुस्तके द्या. ग्रंथरुपात दान देण्याची परंपरा उभी करा. ज्या दविशी सगळ्या विहारांची विद्यापीठं होतील, त्या दविशी डाॅ. बाबासाहेबांचा सद्धम्म अंमलात आला असे समजा,’ असे मत बुलडाणा येथील ज्येष्ठ विचारवंत रवींद्र इंगळे यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभेतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित व्याख्यानमालेचा सोमवारी, १९ डिसेंबरला समारोप झाला. रवींद्र इंगळे यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सद्धम्म’ यावर विचार मांडले. भगवान गाैतम बुद्ध यांचा मुळ धम्म, बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर झालेली परविर्तने, तात्विक बदल, डॉ. आंबेडकर यांनी जी बुद्धिजमची नव्याने मांडणी केली तिचे स्वरुप आदी बाबी मांडून रवींद्र इंगळे यांनी विषयाची मांडणी केली.

भगवान गाैतम बुद्ध, डॉ. आंबेडकरांचा धम्म यातील काळानुरुप, विचारानुसार, तात्विक पातळीवरील फरक मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.रवींद्र इंगळे म्हणाले, बुद्ध समजावून सांगायला डॉ. आंबेडकर यांना फार कमी वेळ मिळाला. याची खंतही त्यांना होती. म्हणून त्यांची अपेक्षा अनुयायांकडून होती. माझ्या समुहातील लोक शिकतील, विचारवंत होतील, चिंतन करतील, मला अभिप्रेत बुद्ध माझ्या समाजासमोर मांडतील, ही त्यांची अपेक्षा होती. संजय सरदार यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविका वाचन अनिल भगत यांनी केले. प्रास्ताविक संदीप इंगळे यांनी केले. वक्त्यांचा परिचय प्रदीप गढरी यांनी करुन दिला. अर्जुन हिंगमिरे यांनी आभार मानले.

नवरचनेचे तत्वज्ञान म्हणजे आंबेडकरवाद आंबेडकरवाद समजावून सांगताना श्री. इंगळे म्हणाले, आधुनिक काळातील सर्व समाजाला वेगळं स्वरुप देण्याचे काम ज्या सिद्धांताने केले तो म्हणजे आंबेडकरवाद आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि मैत्री या पंचमुल्यांच्या आधारस्तंभावर समाजाच्या नवरचनेचे तत्त्वज्ञान म्हणजे आंबेडकरवाद होय. आंबेडकरवादाचा पूर्णविराम हा बाबासाहेबांच्या धर्मांतरात आहे.

व्याख्यान ऑनलाइन उपलब्ध या व्याख्यानमालेत झालेली व्याख्याने तसेच मागील व्याख्यानांचे व्हिडिओ डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सभा, अकोलाच्या सोशल मीडिया चॅनेलवर उपलब्ध आहेत.

बातम्या आणखी आहेत...