आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला पावसाळा:अकोल्यात सर्पमित्रांनी 24 तासात विविध भागातून पकडले 12 साप, सुरक्षितरित्या जंगलात दिले सोडून

अकोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्यात तीन ते चार दिवसांपासून सापांचा संचार वाढलाय. त्यामुळे गेल्या 24 तासांत 12 सापांना विविध ठिकाणांहून पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आल्याची माहिती पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेने दिली.

संस्थेच्या दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे सापांच्या बिळात पाणी शिरत आहे. त्यामुळे साप कोरडे ठिकाण शोधत आहेत. परिणामी शहरी आणि ग्रामीण भागातील रहिवाशी भागात सापांचा संचार आढळून येत आहे. त्यामुळे सध्याच्या काळात सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांनी सर्पदंश टाळण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या सर्पमित्रांनी 24 तासात 12 सापांना पकडले व जंगलात सोडून देण्यात आले. यावेळी सर्पमित्र कुमार सदाशिव, सूरज सदाशिव, वणी सरपंच धनंजय सरकटे, अन्वी सरपंच शेख गनी शेख चाँद, पंचायत समिती सदस्य भारत बोरे, योगेश बोधळे, विजय तायडे, मंगेश तायडे, सोनू वरुडकर, प्रशांत चोरपगार, सागर तायडे, राजेश रायबोले, विकी पलसपगार आदींची उपस्थिती होती.

या सापांना जीवदान

संस्थेने विविध भागातून सुरक्षित ताब्यात घेतलेल्या सापांमध्ये पाच नाग (विषारी), तीन मन्यार (विषारी), एक घोणस (विषारी) व तीन धामण (बिनविषारी) या सापांचा समावेश होता. हे सर्व साप बोरगाव मंजू, अन्वी मिर्जापूर, वणी रांभापूर परिसरात आढळले होते, असे सर्पमित्र कुमार सदांशिव यांनी सांगितले. पुढील काही दिवस शेतशिवारातील कामगिरीचे असल्याने शेतकर्‍यांनी अडचणीच्या ठिकाणी वावरताना सुरक्षित खबरदारी घ्यावी. चुकून कुणास सर्पदंश झाल्यास त्यास धीर देऊन तत्काळ रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...