आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा:सिमेंट रस्त्याचे ‘ऑडिट खड्ड्यात’; व्हीएनआयटी म्हणते, ‘दुरूस्ती करा’

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तांत्रिक तपासणीसाठीचे ११ लाख पाण्यात; ठोस कारवाईवर प्रश्नचिन्ह

शहरातील मुख्य सिमेंट रस्त्यांच्या कामातील भ्रष्टचारप्रकरणी ठोस कारवाई होत नसून, आता तर विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीएनआयटी) या संस्थेचा तांत्रिक तपासणी अहवाल(टेक्निकल ऑडिट ) प्राप्त झाले. मात्र यात रस्त्यांच्या दर्जाऐवजी दुरुस्तीची शिफारस केली आहे. त्यामुळे या अहवालासाठी मनपाने मोजलेल्या ११ लाखांचा काय उपयोग झाला, असा सवाल करण्यात येत आहे.

सन २०१७ मध्ये मनपात भाजपची सत्ता असतानाच राज्यातही हा पक्ष सत्तास्थानी होता. परिणामी रस्त्यांसह इतरही मुलभूत सुविधांसाठी निधी सरकारकडून दिला. शहरात काही मुख्य रस्त्यांची सिमेंट काँक्रिटची कामे झाली. मात्र अनेक ठिकाणची कामे निकृष्ट असल्याचे दिसत आहे. २ ते १० महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडले. याबाबत २०१८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल ऑडिटचा निर्णय घेतला होता. सोशल ऑडिटमध्ये रस्त्यांची पोलखोल झाली. दोषी अधिकारी व कंत्राटदारवर कारवाईची मागणीही झाली. मात्र मनपाने दोषींवर कारवाई टाळत तांत्रिक तपासणी करून घेण्यात धन्यता मानली. तपासणीचे काम नागपूरच्या व्हीएनआयटी या संस्थेला दिले. संस्थेनेही पाच रस्त्यांच्या तपासणीसाठी नमुने गोळा केले. त्याचा अहवाल दीड वर्षानंतर मनपाला पाठवण्यात आला आहे.

या ठिकाणचे घेतले ४३ नमुने
अकोल्यातील प्रमुख पाच रस्त्यांच्या काँक्रिटीकरणात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर ‘व्हीएनआयटी’कडून तांत्रिक तपासणी करण्यात आली. यात पाच रस्त्यांचे एकूण ४३ नमूने घेण्यात आले.

कोण घेणार पुढाकार ?
रस्त्यांसाठी शासनाने प्रचंड निधी पाठवला. मात्र रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत नागरिक व लोकप्रतिनिधींही तक्रारीचा पाढाच वाचला होता. लोकप्रतिनिधींना रस्ते विकासासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन निधी खेचून आणला होता. मात्र निधीचा व्यवस्थित वापर न केल्याने शासनाची प्रतीमा मलीन झाली. प्रशासनावरही ताशेर ओढले गेले. त्यामुळे आता दोषींवर ठोस कारवाईसाठी कोण पुढाकार घेणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

शहरातील रस्ते घेतलेले नमुने
सिव्हिल लाईन्स ते मुख्य डाकघरापर्यंत १२
टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौकापर्यंत १०
अग्रसेन चौक ते दुर्गा चौकापर्यंत १०
अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ०२
टिळक रोड ते मोहता मिलपर्यंत ०९

  • मनपाने तांत्रिक तपासणीसाठी व्हीएनआयटीचे सन २०१९ मध्ये ११ लाख रुपयांचे देयक मंजूर केले.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहवालात रस्त्यांच्या दर्जाबाबत ठोस नोंदी करण्याऐवजी या रस्त्यांच्या दुरुस्तीची शिफारस करण्यात आली.
  • मनपाने अकरा लाख रुपये केवळ शिफारशीसाठी मोजले होते काय, दर्जाच्या ठोस नोंदी का करण्यात आल्या नाहीत,रस्त्याच्या केवळ दुरुस्तीबाबत मार्गदर्शन मागवण्यासाठी तांत्रिक तपासणी करून घेतली का, असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
बातम्या आणखी आहेत...