आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामर्थ्य फाउंडेशनच्या शैक्षणिक मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन:आधुनिक युगात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आवश्यक - प्रा. पंढरीनाथ मांडवगणे

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रगत तंत्रज्ञानामुळे जग जवळ येत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर संवाद वाढत आहे. आधुनिक युगात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे, असे मत अकोला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा शिक्षण तज्ज्ञ प्रा. पंढरीनाथ मांडवगणे यांनी व्यक्त केले. सामर्थ्य फाऊंडेशनच्या शैक्षणिक मार्गदर्शन केंद्राच्या ‘थिऑसॉफिकल सोसायटी’च्या सभागृहात आयोजित उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून् ते बोलत होते. उद्घाटक म्हणून पुणे येथील मराठी थिऑसाॅफिकल फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. संजय पोटे, तर प्रमुख अतिथी म्हणून अकोला एज्युकेशन सोयायटीचे सचिव प्रा. एस.आर. अमरावतीकर उपस्थित होते.

राष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीकांत उखळकर, थिऑसॉफिकल सोयायटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. अशोक सोनोने, ‘सामर्थ्य’चे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, संस्थेचे सल्लागार ॲड.डॉ.दीपक दामोदरे यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कनिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण पळसपगार, सचिव डॉ. गजानन वाघोडे, सहसचिव सुर्यकांत बुडकले, कोषाध्यक्ष रवींद्र बुलनकर, सहकोषाध्यक्ष प्रशांत चाळीसगांवकर, कायदेविषयक सल्लागार ॲड.संतोष भोरे, कार्यकारिणी सदस्य विजय शिंदे, सुधीर धुळधुळे आदींनी अतिथींचे स्वागत केले.

‘सामर्थ्य’च्या शैक्षणिक मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सर्व वयोगटासाठी इंग्रजी संभाषण व भाषा विकसित अभ्यासक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या केंद्रासाठी ‘थिऑसॉफिकल सोसायटी’चे विशेष सहकार्य लाभले आहे. विदर्भातील विद्यार्थी इंग्रजी विषयात मागे पडतात. त्यांना मार्गदर्शनाचा अभाव देखील दिसून येतो. ही कमी दूर करून इंग्रजीमध्ये सक्षम करण्याचे कार्य ‘सामर्थ्य’च्या केंद्रामार्फत होईल, असा विश्वास ॲड. संजय पोटे यांनी व्यक्त केला.

इंग्रजी शिकण्याची गरज

इंग्रजी भाषा अवगत असणे काळाची गरज असल्याचे मत प्रा.एस. आर. अमरावतीकर यांनी व्यक्त केले. आयुष्यात इंग्रजी संभाषण शिकण्याची प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. ती गरज ओळखून इंग्रजी शिकवले पाहिजे, असे डॉ. श्रीकांत उखळकर म्हणाले. सातत्यपूर्ण सराव, वाचन, बोलणे व ऐकण्यात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे शक्य असल्याचे डॉ. दीपक दामोदरे यांनी सांगितले. संस्थेद्वारा राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती प्रास्ताविकात प्रबोध देशपांडे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक सोनोने यांनी, तर आभार ‘थिऑसॉफिकल सोसायटी’चे सचिव रणजीत पवार यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...