आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीत गुरुवारी दुपारी अभ्यागत समितीची आढावा बैठक पार पडली. रुग्णालयातील मनुष्यबळ, खाटा, जुन्या इमारती, आवश्यक असलेली यंत्रसामग्री, रुग्णांना मिळणारी गैरवागणूक, उपचारास होणारा विलंब आदी विविध मुद्दे या बैठकीत गाजले. दरम्यान उत्तम रुग्ण सेवेसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचा प्राधान्यक्रम ठरवून त्या बाबी डीपीडीसी आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधी मिळवून मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.
अभ्यागत समितीचे अध्यक्ष आ. सावरकर यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत वैद्यकीय सुविधा आणि रुग्णसेवेशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. तुलनेत मनुष्यबळ आणि इतर सुविधा कमी पडत आहेत. आवश्यक यंत्र सामग्रीची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली. सर्वोपचारमध्ये रुग्णांना योग्य वागणूक मिळत नाही. टेलिफोनला प्रतिसाद दिला जात नाही. आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. रक्तपेढीत सायंकाळी रक्त घेतले जात नाही. अटी आणि शर्ती पुढे करत आवश्यक ती रक्तदान शिबिरे घेतली जात नाहीत. अशा तक्रारीही यावेळी काहींकडून करण्यात आल्या.
स्ट्रक्चर ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेल्या सर्वोपचाच्या जुन्या इमारतीसंदर्भात चर्चा केली. जुनी इमारत पाडून नवीन बांधकाम प्रस्तावित आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिरंगाई होत असल्याचे जीएमसीकडून सांगण्यात आले. आ. सावरकर यांनी त्वरित सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
यंत्रे मिळत नाहीत ? रुग्णालयासाठी विविध प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रांची गरज आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक विभागाकडून यंत्रांची मागणी हापकीनकडे केली जात आहे. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
वाढीव खाटांनुसार पदे भरा वाढत्या रुग्ण संख्येमुळे सर्वोपचार रुग्णालयाच्या खाटांची संख्या ८४० वर पोहोचली आहे. त्यानुसार वाढीव मनुष्यबळाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवूनही त्यास मंजुरी नसल्याचे बैठकीत सांगितले. या पदांना मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.