आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन जनावरे दगावली:लम्पीच्या संसर्गात वाढ; लक्षणे दिसताच 1962 या क्रमांकावर साधावा संपर्क

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पशूंमध्ये लम्पी चर्मरोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून, आतापर्यंत आढळलेल्या बाधित पशूंची संख्या ५८५ वर पोहोचली आहे. त्यापैकी दोन पशूंचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात कुठेही लम्पीशी संबंधित लक्षणे आढळत असल्यास पशुपालक व शेतकऱ्यांनी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

ऑगस्टच्या अखेर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाने बाधित जनावरे आढळण्यास सुरुवात झाली होती. पाहता पाहता या संसर्गजन्य आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत असून आतापर्यंत ५८५ पशूंना बाधा झाली आहे. यातील अनेक पशू उपचार घेऊन बरे झाले असले तरी दोन पशूंचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तेल्हारा येथील एक व नया अंदुरा (ता. बाळापूर) येथील एक अशा दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आतापर्यंत ज्या गावांमध्ये प्रादुर्भाव आढळला आहे. त्या गावातील पशूंची संख्या ही ३१ हजार ७३३ एवढी आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून संसर्ग रोखण्याचे आव्हान पशुसंवर्धन विभागासमोर उभे आहे.मदतीसंदर्भात लेखी आदेश नाही : लम्पीच्या प्रादुर्भावाने मृत झालेल्या जनावरांसाठी शेतकरी व पशुपालकांना जिल्हा परिषदेच्या निधीतून १० हजार रुपये मदत देण्याचे आदेश महसूल, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ८ सप्टेंबरला जळगाव येथील बैठकीत दिले होते. मात्र यासंदर्भात अद्याप लेखी आदेश प्राप्त झाले नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाने दिली आहे.

तीव्र लक्षणे ठरतात जनावरांसाठी जीवघेणी
लम्पी चर्मरोगाची तज्ज्ञांकडून १५ विविध प्रकारची लक्षणे सांगितली जातात. काही लक्षणे ही जनावरांसाठी जीवघेणी ठरतात. जनावरे खाणे-पिणे सोडतात. शरीरावर गोल आकाराच्या गाठी येतात. तोंडात, घशात आणि श्वसननलिकेत, फुफ्फुसात पुरळ आणि फोड येऊ शकते. पायावर सूज आल्याने जनावरे लंगडतात. दृष्टीही बाधित होते. अशक्तपणा, भूक मंदावणे, वजन कमी होणे, फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह आदी लक्षणांवर वेळेवर उपचार न मिळाल्यास जनावरे दगावण्याची शक्यता असते.

बातम्या आणखी आहेत...