आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्ह्यातील पाणीसाठ्यात वाढ:वान प्रकल्पाचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अकोला2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यातील दुसऱ्या मोठ्या वान प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. तर काटेपूर्णातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. तुर्तास वान प्रकल्पाचे चार दरवाजे 30 सेंटीमिटरने उघडण्यात आले असून यातून 69.15 घनमिटर प्रतिसेकंद (69 हजार 150 लिटर प्रतिसेंकद) तर काटेपूर्णाचे दोन दरवाजे 30 सेंटीमिटरने उघडण्यात आले असून यातून 23.69 घनमिटर प्रतिसेकंद (23 हजार 690 लिटर प्रतिसेकंद) पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यात काटेपूर्णा आणि वान हे दोन मोठे प्रकल्प आहेत. काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता 86.35 दशलक्ष घनमिटर तर वान प्रकल्पाची 81.95 दशलक्ष घनमिटर आहे. काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहरासह विविध गावांची तहान भागवली जाते. तसेच हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली आणली जाते. तर वान प्रकल्पातून अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील विविध गावांची तहान भागवली जाते तसेच हजारो हेक्टर जमिन सिंचनाखाली आणली जाते. त्यामुळे या प्रकल्पाच्या जलसाठ्याकडे नागरिकांचे लक्ष लागले असते. यावर्षी जुलै महिन्यातच वान प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले होते.तर काटेपूर्णा प्रकल्पाचे ऑगस्ट महिन्यात दरवाजे उघडावे लागले. काटेपूर्णा प्रकल्पाच्या सहा दरवाजातून विसर्ग सुरु होता. 6 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता सहा पैकी चार दरवाजे बंद करण्यात आले तर दोन दरवाज्यातून विसर्ग सुरु ठेवण्यात आला.

वान प्रकल्पाचे 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता दोन दरवाजे उघडण्यात आले होते. पाण्याची आवक वाढल्याने ६ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता 4 दारे 30 सेंटीमिटरने उघडून यातून 69.15 घनमिटर प्रतिसेकंद विसर्ग सुरु करण्यात आला. प्रशासनाने काटेपूर्णा, वान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

असा सुरु आहे विसर्ग

जिल्ह्यातील दुसऱ्या मोठ्या वान प्रकल्पातून 24 कोटी 89 लाख 40 हजार लिटर ताशी विसर्ग सुरु आहे तर काटेपूर्णा प्रकल्पातून 8 कोटी 52 लाख 84 हजार लिटर ताशी विसर्ग सुरु आहे.

दगडपारवा प्रकल्पातूनही विसर्ग सुरुच

दरम्यान शहराचे पूरापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेल्या दगड पारवा प्रकल्पातून गेल्या चार दिवसापासुन विसर्ग सुरु आहे. प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून यातून 18.30 घनमिटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...