आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात लम्पीने 32 जनावरांचा मृत्यू, 1435 बाधित:राधाकृष्ण विखे-पाटलांची माहिती; लसीकरणासाठी खासगी पशू डॉक्टरांची सेवा घेण्याचे निर्देश

अकोला24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात राजस्थाननंतर महाराष्ट्रात राज्याच्या विविध भागात जनावरांमधील लम्पी चर्म रोगाचा प्रसार वाढत आहे. राज्यात आतापर्यंत 17 जिल्ह्यांमध्ये 1435 जनावरांना लम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. त्यापैकी 32 जनावरे दगावल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी, (8 सप्टेंबरला) अकोल्यात दिली.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण गरजेचे

या आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेगाने लसीकरण होण्याची गरज आहे. त्यामुळे खासगी पशु डॉक्टरांची लसीकरणासाठी थेट मदत घ्यावी. त्यांना मानधन देण्यासंदर्भात जिल्हा स्तरावर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

गावात भेट देऊन केली पाहणी

जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अकोला तालुक्यातील निपाणा आणि पैलपाडा या गावात भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लम्पीच्या प्रादूर्भावाची राज्यातील स्थिती सांगितली. राज्यात 17 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 2 लाख 80 हजार पशुंचे लसीकरण झाला आहे.

पशु डॉक्टरांची घ्या मदत

उद्भव झालेल्या ठिकाणांच्या 5 किमी त्रिज्या परिसरात येणाऱ्या सर्व जनावरांच्या लसीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. अजून 5 लाख 71 हजार पशुंचे लसीकरण अद्याप बाकी आहे, असेही त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस वाढता प्रादूर्भाव पाहता लसीकरण वेगाने करावे लागणार आहे. त्यासाठी मनुष्यबळाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी खासगी व्यवसाय करणाऱ्या पशु डॉक्टरांची थेट मदत घ्यावी. त्यांना मानधन देण्यासाठी जिल्हा स्तरावर निर्णय घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पशुधन विकास मंडळ अकोल्यात स्थलांतरीत करू

राज्यात दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाची स्थापन करण्यात आली आहे. मंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथून (मुख्यालय) अकोल्यात 12 सप्टेंबर 2003 रोजी स्थलांतरीत करण्यात आले होते. मात्र हे कार्यालय नागपूर येथील वळू संशोधन केंद्रात स्थलांतरित करण्यात आले. यासंदर्भातील शासन निर्णय 5 फेब्रुवारी 2021 ला जारी करण्यात आला होता. त्यानंतर 7 तारखेला हे कार्यालय स्थलांतरीही करण्यात आले होते. हे कार्यालय अकोल्यात राहण्यासाठी भाजप, प्रहार जनशक्ति पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यासंदर्भात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, या विषयावर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, पशुधन विकास मंडळ पुन्हा अकोल्यातच स्थलांतरीत करू.

बातम्या आणखी आहेत...