आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:वैदर्भीय साहित्य, संस्कृतीची प्रदर्शनातून ओळख

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विविध माध्यमातील प्रचार-प्रसाराच्या काळात मर्यादित साहित्य व्हायरल होतं. यात स्थानिक साहित्य आणि साहित्यिक दुर्लक्षित होतात, तर बऱ्याचदा काही लेखक आपल्या मातीतले असूनही आपल्याला त्यांची ओळखं नसते. वऱ्हाडातील अशाच साहित्यरत्नांची, तसेच येथील संस्कृती, पर्यटनाची माहिती संमेलनाच्या दालनातून देण्यात आली.

संमेलनात विदर्भाची वेगळी ओळखं दिसावी. यासाठी एका विशिष्ट दालनाची संकल्पना पुढे आली. डॉ. गजानन नारे, सीमा शेटे आणि नंदकिशोर चिपडे यांनी पुढाकार घेऊन यास मूर्तरूप दिले. विदर्भातील दिवंगत साहित्यिक, कवी, पर्यटन स्थळ, भाषा वैशिष्ट्य आदींनी सजलेले हे अभ्यासपूर्ण दालन संमेलनात महत्त्वाचे ठरले. यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात हे प्रदर्शन लावण्यात आले. यास येथे उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता.

या दालनात कवी ग्रेस, द. भि. कुलकर्णी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गो. रा. वैराळे, ना. घ. देशपांडे, डॉ. आशा सावदेकर, वा. कृ. चोरघडे, पुरुषोत्तम बोरकर, सुलभा हर्लेकर, डॉ. सदाशिव कुल्ली, प्राचार्य राम शेवाळकर, मधुकर केचे, कुसुमावती देशपांडे, तुळशीराम काजे, उद्धव शेळके, डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. वि. भी. कोलते, डॉ. अनंत देविदास अडावदकर, कवीवर्य सुरेश भट, उ.रा. गिरी, शंकर बडे, ज्योती लांजेवार, वामन नारायण देशपांडे, नारायण मुरलीधर गुप्ते, मनोहर तल्हार, डॉ. मधुकर आष्टीकर, कलिम खान, ग. त्र्य. माडखोलकर, प्रा. किशोर मोरे आदींची सविस्तर माहिती देण्यात आली.

वैदर्भीय शब्दांची वेगळी छाप
वैदर्भीय भाषेची एक वेगळी छाप आहे. वऱ्हाडी माणसाकडून वापरण्यात येणाऱ्या शब्दांतून आपल्याला त्याची ओळख होते. चून-पिठलं, पुनेव-पौर्णिमा, सोयरीक-लग्नगाठ, पोया-पोळा, वगार-रेडकू, अल्लादी-अलगद, गयभान्या-भान नसलेला असे अनेक शब्द वऱ्हाडी भाषेची ओळखं आहे. प्रदर्शनात वैदर्भीय शब्द आणि प्रमाण भाषेतील शब्द, असे फलकांच्या माध्यमातून सांगण्यात आले. सोबत वऱ्हाडी म्हणींचाही समावेश होता.

विदर्भातील पर्यटन स्थळांची माहिती
विदर्भातील सर्व जिल्हे आणि येथील ठळक वैशिष्ट्य फलकातून मांडण्यात आले. सोबतच येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ, पुरातन मंदिर, किल्ले, राष्ट्रीय उद्यान, विविध प्रकल्प आदींची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...