आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यात थंडी वाढली; पारा 8.6 अंशांपर्यंत घसरला

अकोला18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील किमान तापमानात दोन दिवसांत आणखी दोन अंशांनी घट झाली आहे. शनिवारी, १९ नोव्हेंबरला जिल्ह्यात किमान तापमानाची १३.३ अंश सेल्सिअस नोंद हवामान विभागाने केली. तर शहरालगतच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वेधशाळेने शनिवारी १९ नोव्हेंरबला किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. यंदाच्या हिवाळ्यात ही पहिली सर्वात कमी तापमानाची नोंद आहे.

यंदा २३ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात थंडीला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत १७ ते १८ अंश सेल्सिअस तापमान राहिले. एक ते १५ नोव्हेबरपर्यंत १६ ते १८ अंश सेल्सिअस तापमान राहिले. १६ आणि १७ नोव्हेंबर या दोन दिवशी किमान पारा १५ अंशांच्यावर होता. गेल्या दोन दिवसात त्यात प्रत्येकी एक एक अंशांनी घट झाल्याचे दिसते.

शनिवारी, १३.३ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले. जिल्ह्यातील कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस एवढे राहत आहे. उत्तरेकडील थंड प्रवाहामुळे चार दिवसांपासून तापमानात सारखी घसरण होत असल्याने ग्रामीण भागात सायंकाळपासूनच हुडकी जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. रब्बी हंगामातील कामासाठी शेतकऱ्यांना रात्री आणि पहाटेच शेत शिवार गाठावे लागते. त्यामुळे थंडीचा सामना करणे असह्य ठरत आहे. जिल्ह्यात यंदा झालेल्या समाधानकारक पावसाने थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रब्बी पिकांसाठी अनुकूल वातावरण
वाढती थंडी ही रब्बी हंगामातील पिकांसाठी फायद्याची असून, ज्या भागात रब्बीतील गहू आणि हरभरा पिकाची पेरणी आटोपली तेथे पिकांच्या वाढीसाठी ही थंडी फायद्याची आहे, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...