आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटेपूर्णा प्रकल्पातून विसर्ग सुरू:दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अकोला15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे 11 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता दोन दरवाजे उघडण्यात आले. 12 सप्टेंबर रोजी पाण्याचा फ्लो कमी झाल्याने सकाळी 11 वाजता विसर्ग कमी करण्यात आला. दरम्यान प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यात काटेपूर्णा प्रकल्पा सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. प्रकल्पाची साठवण क्षमता 86.35 दशलक्ष घनमीटर आहे. यावर्षी जुलै महिन्याच्या अखेरीस जोरदार पाऊस झाल्याने 31 जुलैला प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले. ऑगस्ट महिन्यातही प्रकल्पाचे दरवाजे वारंवार उघडावे लागले. तर सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने 1 सप्टेंबरपासून वारंवार प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले आहेत. 11 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले. यातून 50.16 घनमीटर प्रतिसेकंद (50 हजार 160 लीटर प्रतिसेकंद) सुरू करण्यात आला.

सतर्क राहण्याचा इशारा

प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रात्रभर प्रकल्पाच्या दोन दरवाज्यातून विसर्ग सुरू होती. 12 सप्टेंबर रोजी प्रकल्पात पाण्याची आवक काही प्रमाणात कमी झाल्याने दरवाजे 30 सेंटीमीटरवरून 15 सेंटीमीटर करण्यात आले. तसेच विसर्ग कमी करून 25.64 घनमीटर प्रतिसेकंद (25 हजार 640 लीटर प्रतिसेकंद) करण्यात आला आहे. दरम्यान प्रकल्पातील पाण्याची आवक पाहून प्रकल्पाचे दरवाजे अधिक प्रमाणात उघडायचे तसेच बंद करायचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मोर्णा-उमा प्रकल्पातून विसर्ग

काटेपूर्णा प्रकल्पातून विसर्ग सुरू असताना जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मोर्णा आणि मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या दोन मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरुन विसर्ग सुरू आहे. मोर्णा प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 18 सेंटीमीटरने विसर्ग सुरू असून 28.24 घनमीटर प्रतिसेकंद (28 हजार 240 लीटर प्रतिसेंकद) तर उमा प्रकल्पाच्या सांडव्यावरून 3 सेंटीमीटरने पाणी वाहात असून 2.52 घनमीटर प्रतिसेकंद (2 हजार 520 लीटर प्रतिसेकंद) पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...