आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापा:कृषी निविष्ठा जिल्हास्तरीय पथक; बनावट खत तयार करणाऱ्या कंपनीवर छापा

अकोला13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसीतील एका गोडाउनमध्ये नामांकित कंपनीच्या नावाने बनावट खत तयार करणाऱ्या एका कंपनीवर कृषी निविष्ठा जिल्हास्तरीय पथक व पोलिसांनी धाड टाकली. स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी कारवाई करून तब्बल २० लाख ५ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. एक व्यक्ती एमआयडीसीमध्ये बनावट खत तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. कृषी अधिकारी पंचायत समिती अकोला रोहिणी मोघाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी १५ जूनला एमआयडीसी अकोला येथील एका गोडावूनमध्ये भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी सोडियम सल्फेट (प्रत्येकी ५० किलो याप्रमाणे) १३५ बॅग, हायब्रीड सुमो ग्रॅन्युएल १७० बकेट, इमल्सिफायर लिक्विड १४ प्लास्टिक टाक्या (२८०० लिटर एकूण), निमसीडस कर्नल ऑइल (२०५० लिटर), रासायनिक खत ०.५२.३४ (एकूण ४०० किलो), कीटकनाशक बनावट खत तयार करणाऱ्या कंपनीवर छापा बाटल्या ४० नग इत्यादी व यंत्रसामग्री इत्यादी साहित्य आढळले.

या साहित्याची किंमत २० लाख ५ हजार ७३० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या साहित्याच्या आधारे याठिकाणी शासनाच्या व शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या उद्देशाने जैव उत्तेजक उत्पादने विक्रीचे प्रमाणपत्र असताना नामवंत कंपनीच्या रासायनिक खताच्या बॅगचा वापर करुन अवैधरीत्या बनावट रासायनिक खत उत्पादन करीत असल्याचे आढळले. याबाबत राहुल नामदेव सरोदे (वय ३६) रा. गांधीनगर पोस्ट ऑफिसजवळ चांदूर अकोला या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. ४२० सह विविध
कलमांन्वये गुन्हा दाखल
आरोपीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत कलम ४२० भादंविसह कलम ७, १९, २१ खत नियंत्रण आदेश १९८५, कलम ३, ९ अत्यावश्यक वस्तू कायदा १९६८, कलम ९, ३ कीटकनाशक नियम १९७१, कलम ४, ६, ९, १०, १५ कीटकनाशक आदेश १९८६, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीस अटक करण्यात आली आहे.

औद्योगिक परिसरात संयुक्त कारवाई
पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनातa स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, जिल्हा कृषी विकास अधिकारी अकोला यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. पथक प्रमुख डॉ. मुरली इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ दिगंबर जाधव, जिल्हास्तरीय भरारी पथक सचिव तथा मोहिम अधिकारी मिलिंद जंजाळ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितीन लोखंडे कृषी अधिकारी पंचायत समिती अकोला रोहिणी मोघाड, तालुका कृषी अधिकारी शशीकिरण जांभरुणकर, ग्राम विकास अधिकारी पंकज जगताप, एएसआय दशरथ बोरकर, नितीन ठाकरे, गोकुळ चव्हाण, लिलाधर खंडारे, स्वप्निल खेडकर, अन्सार व अक्षय बोबडे आदींची यामध्ये समावेश होता.

..तर प्रशासनास कळवा
बनावट खत तयार करणाऱ्या कंपनीविरोधात बुधवारी रात्री उशीरा कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात कुठेही शेतकरी किंवा कुणालाही असे संशयित किंवा बनावट प्रकार आढळत असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा.
- डॉ. मुरली इंगळे, पथक प्रमुख

बातम्या आणखी आहेत...