आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागाडगेबाबा दिवसा आपल्या खराट्याने गाव स्वच्छ करायचे आणि संध्याकाळी आपल्या कीर्तनरूपी खराट्याने माणसाच्या डोक्यातील वाईट विचार काढण्याचे काम करायचे, जीवन कशा पद्धतीने जगावे याचे मार्गदर्शन करायचे. बंदीजन हो येथून जाताना संत गाडगेबाबा यांचा विचाररूपी खराटा सोबत न्या, त्याने आपल्या डोक्यातील वाईट विचार साफ करा, भजन स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या विचारांशी शक्ती सोबत न्या, असे आवाहन शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी केले.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील सर्व कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अकोला कारागृहातील बंदीजनांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत ‘अबीर गुलाल’‘तुझा माझा देवा’,‘नको देवराया अंत आता पाहू’,आणि स्वरचित ‘कथा जीवनाची मी सांगायला आलो’या रचना सादर केल्या. त्यावेळी खाबिया यांनी बंदीजनांशी संवाद साधला.
याप्रसंगी कारागृह अधीक्षक सुभाष निर्मळ, वरिष्ठ तुरंग अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, तुरुंग अधिकारी महेश जोशी, डॉ. रवींद्र आर्य, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संजय मिसाळ, शंकर धुमाळ, संगीत शिक्षक पद्माकर मोरे, प्रतिष्ठानचे अकोला जिल्हा अध्यक्ष शिवराज गावंडे, बुलडाणा जिल्हाध्यक्ष हरिदास आखरे, नलिनी गावंडे, विशाल बोरे, आरजे गौरव, माधव भगत यांची उपस्थिती होती. श्याम राऊत यांनी आभार मानले.
विजेत्यांना महाकरंडक आणि प्रमाणपत्र महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही अध्यात्माची ताकद गेल्या एक महिन्यापासून भजन आणि अभंगाच्या सरावामुळे बंदीवानांच्या वागण्यात, बोलण्यात फरक जाणवत आहे. हीच अध्यात्मामध्ये ताकद आहे. - सुभाष निर्मळ, अधीक्षक, अकोला कारागृह.
स्व. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ साहित्य भेट स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघाला दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, १० जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणादायी ८२ पुस्तकांचा संच देण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.