आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Leader Of Opposition Praveen Darekar Gave Eight Days To Municipal Commissioner For Inquiry, Layout Case At Ganganagar 2 Kharap Road; Letter Given To Municipal Commissioner | Marathi News

लेआऊट प्रकरण:विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी मनपा आयुक्तांना दिले चौकशीसाठी आठ दिवस, गंगानगर -2 खरप रोड येथील लेआऊट प्रकरण; महापालिका आयुक्तांना दिले पत्र

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महानगर पालिकेच्या मंजूर आराखड्यानुसार डीपी रोडच्या विस्तारात तफावत असताना नगररचना विभागाच्या संचालकांनी महानगर पालिकेच्या आयुक्तांना अंधारात ठेवत चुकीच्या पद्धतीने ले आउटला मंजुरी दिल्याचे प्रकरण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्यापर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल आपल्याला आठ दिवसात पाठवावा, असे पत्रच, प्रवीण दरेकर यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

आयुक्तांना ७ एप्रिलला दिलेल्या पत्रात दरेकर यांनी नमूद केले की, ‘या भागातील नागरिकांनी आपल्याकडे व शासनाकडे, नगर रचना विभागाकडे वारंवार या मंजूर ले-आऊट, नकाशात कशा प्रकारे त्रुटी आहेत हे निदर्शनास आणून दिले होते. आपल्याला २४ फेब्रुवारी २०२२ च्या अग्रेषित केलेल्या पत्रात याबाबतीत या भागातील नागरिकांना न्याय मिळावा म्हणून आपल्याकडे या प्रकरणी चौकशीसाठी पाठवले होते. परंतु खेदाने नमूद करावेसे वाटते की, आपल्या कार्यालयाकडून यावर कारवाई केली किंवा कसे याबाबत आपल्याला अद्यापपर्यंत अवगत केले नाही. यामध्ये लेआऊट नकाशा मंजूर करताना अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले. आपल्याला २९ मार्च २०२२ रोजी या भागातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनाचा आपण अभ्यास केला तर नगररचना विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संगनमताने कशा प्रकारे भ्रष्टाचार केला, हे निदर्शनास येईल. स्वत: जातीने आठ दिवसांच्या आत या प्रकरणाचीचौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठवावा. आयुक्त या प्रकरणाची चौकशी करून काय निर्णय घेतात याकडे गंगानगर खरप रोड येथील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

काय आहे प्रकरण ?
गंगानगर भाग-२ मधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा पासून खरप रोड १२ मीटर रुंदीचा असताना तो ९ मीटरचा दर्शवला. तर डीपी रोड १२ अधिक १२ मीटर रुंदीचा अर्सलान पार्कच्या पश्चिमेस असल्याची नोंद रहिवाशांकडे असलेल्या पुराव्यामध्ये आहे.ते सर्व पुरावे आणि आक्षेप महापालिका, सहायक संचालक नगर रचना यांच्याकडे दाखल करण्यात आले. त्याची कोणतीही दखल न घेता नगर रचना विभागाने घाईगर्दीत लेआऊटला मंजूरी दिली. विशेष म्हणजे, अंतिम मंजुरीचे अधिकार असलेल्या आयुक्तांना त्यापासून अंधारात ठेवले. खरप रोड १२ मिटरऐवजी ९ मिटर दर्शवण्यात आला. त्यामध्ये अधिक १५ मिटर डीपी रोड असा एकुण २४ मिटरचा रस्ता हा फक्त पूर्व बाजूस दाखवण्यात आला.