आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका मुख्य कार्यालयातील एक इमारत देखभाल दुरुस्ती अभावी शिकस्त झाली आहे. इमारतीच्या स्लॅबवर मोठ्या प्रमाणात मलबा तसेच कचरा पडल्याने पावसाचे पाणी स्लॅब गळत असून पाणी मुरतही आहे. पाणी मुरत असल्याने स्लॅबसह भिंतीला ओल लागली आहे. सन १९८४ मध्ये बांधलेल्या या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. त्यामुळे इमारतीची देखभाल दुरुस्ती न केल्यास एखादवेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिकेच्या मुख्य कार्यालयात महापौर कक्ष, सभागृह तसेच मालमत्ता कर, पाणी पुरवठा, लेखा विभाग, भांडार विभागाच्या इमारती या जुन्या आहेत. तर २००० साली महापालिकेत नवी इमारतही बांधण्यात आली. ज्या इमारतीत मालमत्ता कर विभाग, पाणी पुरवठा, भांडार विभाग, बॅक, रोखपाल कार्यालय आहे. ही इमारत १९८४ ला बांधलेली आहे.
त्यापूर्वी या ठिकाणी केवळ दुकानाचे गाळे होते. या गाळ्यांवरच कार्यालयास जागा अपुरी पडत असल्याने त्यावेळी दुसरा मजला बांधण्यात आला. सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी हे बांधकाम चुना आणि रेतीत झालेले आहे. या विविध विभागात अनेक कर्मचारी काम करतात तसेच नागरिकांचेही विविध कामांसाठी सतत जाणे-येणे असते. या इमारतीच्या स्लॅबवर मोठ्या प्रमाणात कचरा तसेच मलबा पडलेला असताना पावसाचे पाणी वाहून न जाता स्लॅबवर साचते. इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने स्लॅबमधून पाण्याची गळती होत आहे. पाऊस सुरू झाला की पाणी पुरवठा विभाग, लेखा विभाग, मालमत्ता कर विभागात पाण्याची धार लागते. त्यामुळेही इमारतीची वाटचाल शिकस्त इमारतीकडे होत आहे. या इमारतीची देखभाल दुरुस्ती न केल्यास एखादवेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट अद्याप झालेले नाही
महापालिकेच्या या इमारतीकडे पाहिल्या नंतर तिची अवस्था लक्षात येते. मात्र अद्यापही या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करून देखभाल दुरुस्ती करता येते का? ही बाब तपासणे आवश्यक आहे.
प्रस्ताव सादर करू; मंजुरीनंतर दुरुस्तीचे काम
इमारतीच्या स्लॅबमधून पाणी गळू नये यासाठी दुरुस्तीचा प्रस्ताव लवकरच सादर करणार आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्या नंतर दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल. - - अजय गुजर, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.