आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी, १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. राज्यातील सहापैकी चार जागांवरील निवडणूक बिनविरोध झाली मात्र विदर्भातील नागपूर आणि अकोला या दोन जागांवर चुरशीने निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे मतदानाच्या एक दिवस आधीच नाट्यमय घडामोडीत काँग्रेसने नागपुरातील आपला उमेदवार बदलला. नागपुरात मतदानाच्या एक दिवस आधीच काँग्रेसने अधिकृत उमेदवार डाॅ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना बदलत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे खळबळ माजली आहे. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार बदलणार असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती.
सोमवारपासूनच काँग्रेस उमेदवार बदलत असल्याच्या चर्चेने जोर पकडला होता. त्यावर छोटू भाेयर यांनी पत्र परिषद घेत भाजप नाहक अफवा पसरवत असल्याचा आरोप केला होता. भोयर यांनी गुरुवारी सकाळीही आपणच अधिकृत उमेदवार असून विजयी होणार असल्याचा दावा केला होता. तर सायंकाळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या सहीने जारी केलेल्या पत्रात अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना पाठिंबा जाहीर करीत असल्याचे स्पष्ट केले. डाॅ. रवींद्र भाेयर यांनी ही निवडणूक लढवण्यास असमर्थता व्यक्त केल्यामुळे देशमुख यांना पाठिंबा जाहीर करीत असल्याचे म्हटले आहे.
पक्षाचा निर्णय मान्य- भोयर : काँग्रेसने शेवटच्या क्षणी अधिकृत उमेदवार छोटू भोयर यांना बदलून अपक्ष मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे दुखावलेले छोटू भोयर बोलताना त्यांची वेदना लपवू शकले नाहीत. मला काँग्रेसचा निर्णय मान्य आहे. पण, मी लढण्यासाठी असमर्थता व्यक्त केली नाही. याच्याशी मी सहमत नाही, असे भोयर यांनी स्पष्ट केले.
अकोला : बाजोरिया की खंडेलवाल?
विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान होत आहे. एकूण ८२२ मतदार असून, यात ३८७ महिला तर ५३५ पुरुष मतदारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आ. गाेपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक मतदार महाविकास आघाडीकडे असले तरी वंचित बहुजन आघाडी व अन्य मतदार निर्णायक ठरणार आहेत. तसेच ‘अर्थ’पूर्ण चर्चेत बाजी मारणाराच विजयश्री खेचून आणले, असे जाणकारांचे म्हणणे आहे. आपली मते फुटणार नाहीत आणि अन्य मतंही खेचून कशी येतील, यासाठी दोन्ही बाजूने कस लागेल. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात पहिलीच विधान परिषदेची निवडणूक हाेत आहे. अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. गतवेळी भाजप-शिवसेनेची युती हाेती. युती विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचे रणजित सपकाळ उभे ठाकले हाेते. युतीचे उमेदवार आ. गाेपिकिशन बाजोरिया विजयी झाले हाेते. यंदा मात्र शिवसेना, काँग्रेस, राकाँ, ‘प्रहार’चा समावेश असलेली महािवकास आघाडी असल्याने व भाजपनेही उडी घेतल्याने निवडणूक चुरशीची होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.