आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 हजार कोविशील्डचे डोस शिल्लक:कोविशील्डचा साठा मर्यादित : लसीकरणात घट

अकोला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत कोविशील्ड लसींचा साठा पुन्हा मर्यादित शिल्लक असल्याने लसीकरण सत्र प्रभावित होत आहेत. सद्यःस्थितीत तीन ते चार दिवस पुरतील एवढे म्हणजे केवळ १४ हजार कोविशील्डचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे लसीकरण सत्रांची संख्या ३० ने घटून ७० वर आली आहे.

जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने वेग घेतलेला असतानाच काही दिवसांपासून कोविशील्ड लसीची टंचाई भासत आहे. यापूर्वी जिल्ह्यातील कोविशील्ड लस साठा संपल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील लसीकरण सत्र प्रभावित झाले होते. त्यानंतर लगतच्या बुलडाणा व हिंगाेली जिल्ह्यातून लस मागवण्यात आली होती. हा लस साठा संपुष्टात आल्यानंतर वर्धा जिल्ह्यातून ४० हजार कोविशिल्डच्या लस आणल्या होत्या. त्यातील १४ हजार डोस सध्या शिल्लक आहेत.

दरम्यान आठवडाभरापूर्वी जिल्ह्यात लसीकरणाचे १०० सत्र कार्यान्वित होते. दिवसभरात पाच ते सहा हजार डोस लाभार्थींना दिले जात होते. परंतु लस साठा मर्यादित शिल्लक असल्याने सत्रांमध्ये घट झाली असून, लसीकरणही ३ हजार डोसच्या दरम्यान होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १८ ते ५९ या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी १५ जुलैपासून शासकीय लसीकरण केंद्रावरून मोफत बूस्टर डोस देणे सुरू झाले. ३० सप्टेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याने लसींची मागणी अधिक आहे.

इतर जिल्ह्यात साठा शिल्लक नाही
दरम्यान जिल्ह्यात कोविशील्ड लस उपलब्ध व्हावी, यासाठी वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात लसीच्या उपलब्धतेची माहिती घेण्यात आली. मात्र सध्या दोन्ही जिल्ह्यात शिल्लक असलेला साठा हा त्यांच्या गरजेपुरता आहे. त्यामुळे जिल्ह्याला आता कोविशील्ड लस पुण्यातून पुरवली जाणार असल्याचे मोहिमेतील अधिकाऱ्यांकडून कळते.

बातम्या आणखी आहेत...