आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
‘लॉकडाऊनमुळे हातात पैका नाही... माया पोरीची ट्यूशन बंद झाली... शाळेचे मास्तर बी ऑनलाइन शिकवायचे.... पण घरी मोठा मोबाइल नाई... तिनं अभ्यासाचं टेन्शन घेतलं. म्हणे... आई माया मैत्रिणी १० वी पास होतीन अन् मी नापास होईन... मले ऑनलाइन वर्गासाठी मोबाइल फाेन घेऊन दे नं... घरात दोन टाईम खायले नाही... तिले मोबाइल कसा घेऊन देऊ? तरी मी सांगो, नापास झाली तरी काई होतं नाही; तरीपण तिनं नाही एेकलं...’ भीमनगरातील १० व्या वर्गातील पायल मोहन गवई (१५ वर्ष) हिने मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली. यावेळी पायलच्या जाण्याने धक्का बसलेल्या तिची आई धाय मोकलुन रडत होती. ‘मोबाइलपायी माया पायलचा जीव गेला, आता मायी लाडाची पोर डोयानं दिसणार नाही...’ असं सांगत असताना हंबरडा फोडणाऱ्या मातेचा आक्रोश पाहून उपस्थितांच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या. पायलच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची.
वडील हात मजूर, तर आई शेतात कामाला जायची. पण लॉकडाऊनमुळे काम बंद पडले. घरात दोन मुली आणि एक मुलगा. पायल जुने शहरातील खंडेलवाल शाळेत होती. ती घरातील सर्वाधिक हुशार मुलगी. ‘मला खूप शिकायचे आहे, घरची परिस्थिती बदलायची आहे’, असे तिचे स्वप्न होते. मात्र, कोरोनामुळे वर्षभर शाळेचे वर्ग ऑनलाइन सुरू झाले. मात्र घरी स्मार्टफोन नसल्याने तिला ते शक्य झाले नाही. २३ तारखेपासून बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. यामुळे शाळेकडून सराव परीक्षा घेतली जात आहे. मात्र, स्मार्ट फोन नसल्यामुळे पायलला सराव परीक्षाच देता आली नाही. तिने वारंवार घरच्यांना मोबाइल घेण्याचे सांगितले. ‘चार-पाच दिवसांपासून अभ्यास होत नाही, मला खूप टेन्शन आले आहे’, असे ती लहान भावाजवळ रडत-रडत सांगत असल्याचे कळते. मंगळवारी शेवटी तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
तिला पोलिस अधिकारी व्हायचे हाेते; मैत्रिणी झाल्या भावूक
ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहणे शक्य हाेत नव्हते. त्यामुळे माझं कस होईल, असे पायल चार दिवसांपूर्वीच म्हणाली हाेती. आम्ही तिची समजूत काढली. मला पोलिस अधिकारी बनायचे आहे, असे ती नेहमी सांगायची; पण एवढ्यातच ती आम्हाला तोडून जाईल. विचारही केला नव्हता. पायलच्या मृत्यूमुळे भावूक झालेल्या मैत्रिणी सांगत होत्या.
मीच पोरीसाठी कमी पडलो; गरीब वडीलांना अश्रू अनावर…
बाबा...मला अभ्यास काहीच समजत नाही. ऑनलाइन वर्गात मास्तर समजावून सांगतात; पण मोबाइल नसल्याने मला उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे मी १० वी नापास होणार, असचं ती म्हणत होती. मात्र परिस्थितीमुळे मी काहीच करू शकलो नाही. शेवटी जीव दिला लेकिने. मीच कमी पडलो. मुलीला मोबाइल घेऊन देता आला नाही, अशा शब्दात पायलच्या वडिलांनी भावनांना वाट माेकळी करुन िदली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.