आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकमान्य नगरातील जलवाहिनी फुटली:अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत, दुरुस्तीला 2 दिवस लागण्याची शक्यता

अकोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकमान्य नगर भागातील जलकुंभातुन पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मेहरे नगर भागात फुटल्याने विविध भागांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनी दुरुस्तीला दोन दिवस लागण्याची शक्यता असल्याने मंगळवारी ज्या भागाला पाणीपुरवठा होता, त्या भागाला दोन दिवसा नंतर पाणी पुरवठा होईल.

जुने शहरातील लोकमान्य नगर भागातील जलकुंभातून विविध भागांना पाणी पुरवठा केला जातो. या जलकुंभातील कॅनॉल मार्गे गेलेल्या जलवाहिनी अंतर्गत जलवाहिनी जोडलेली आहे. ही अंतर्गत जलवाहिनी हद्दवाढ होण्याच्या आधी पिव्हीसी पद्धतीची अंथरलेली आहे. या वाहिनीवरुन लोडेड ट्रक गेल्याने ही जलवाहिनी फुटली.

मंगळवारी पाणीपुरवठा सुरू केल्या नंतर ही जलवाहिनी फुटल्याची बाब लक्षात आली. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता तुषार टिकाईत यांनी जलकुंभातून होणारा पाणी पुरवठा बंद केला. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता असल्याने मंगळवारी ज्या भागाला पाणी पुरवठा होणार होता, त्या भागाला आता दोन दिवसानंतर पाणी पुरवठा होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत

लोकमान्य जलकुंभातून तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिनी फुटल्याने पार्वती नगर, अयोध्या नगर, गायत्री नगर, शारदा नगर, जाणता राजा चौक परिसर, भवानी नगर आदी भागाला मंगळवारी पाणी पुरवठा होवू शकला नाही.

दुरुस्तीस विलंब होण्याची शक्यता

महापालिकेने जलवाहिनी दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांचे देयके गेल्या काही महिन्यापासून दिलेली नाहीत. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील पंप दुरुस्ती करण्यास कंत्राटदाराने नकार दिला होता. परिणामी पंप दुरुस्ती कनिष्ठ अभियंत्यांना करावी लागली. आताही जलकुंभ निहाय जलवाहिनी दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांची देयके प्रलंबित आहेत. त्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीच्या कामास कंत्राटदार त्वरित होकार देणार की दुरुस्तीस विलंब होणार? ही बाब येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...