आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजन्म घेणाऱ्याचा मृत्यू काेणीही टाळू शकत नाही. मृत्यू हा शाश्वत आहे. नरदेह हा नाशवंत आहे. काळाच्या ओघात आयुष्य केव्हा संपते ते कळतही नाही. हा नरदेह वाया जाऊ नये म्हणून सावध होऊन याचा क्षणोक्षणी विचार करा. संतांच्या सहवासाची आवड लावून घ्या आणि तातडीने परमार्थ साधा. शेवटी परमार्थ हा भवसागर पार करू शकतो, असा उद्बोधक विचार श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे सचिव रवींद्र महाराज वानखडे यांनी मांडले.
विदर्भाचे देहू म्हणून प्रख्यात असलेल्या श्री क्षेत्र कालवाडी येथील संत श्री तुकाराम बीज उत्सवात कीर्तनमालेचे तिसरे पुष्प गुंफताना रवींद्र महाराज बोलत होते. क्षणोक्षणी हाचि करावा विचार। तरावया पार भवसिंधू।। या अभंगाचा भावार्थ प्रकट करताना प्रमाण व दृष्टांत सांगत उपस्थित भाविक श्रोत्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. संतती, संगती, संपत्ती आणि प्रकृतीचा विचार झालाच पाहिजे. त्याशिवाय चांगला संसार होणार नाही.
या संसारातून अलगद बाजूला होऊन संत संगत करावी. मात्र डोळ्यात धूर भरून राहिल्याप्रमाणे इहलोकीचे व्यवहार करू नका. जीवन क्षणभंगूर आहे, अशाश्वत आहे. या क्षणी आपण जिवंत आहोत पुढच्या क्षणी असूच याची खात्री देता येत नाही. या अनिश्चिततेचा अनुभव आपल्याला जीवनात वारंवार येत असतो. या अनुभवातून मनुष्याने संत सहवासाची आवड लावून घ्यावी आणि तातडीने परमार्थ साधल्यास आपली नाव भवसिंधू पार तरुण जाईल. कालवाडी येथे गुरुवर्य महाराजांचा कृपाप्रसाद लाभला. त्याचे पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली आहे. या भूमीतूनच अकोटचे श्रद्धासागर क्षेत्र निर्माण झाले. वै. पंजाबरावांची परमार्थिक सेवा मोठी आहे, असे सांगून भाऊंच्या पावन स्मृतीला उजाळा दिला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संतोष शेषराव हिंगणकर यांनी कीर्तनकार रवींद्र महाराजांचा यथोचित सत्कार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.