आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकृत वीजजोडणी घ्या:महावितरणतर्फे गणेश मंडळाना स्वस्त विजेचे पर्याय, असे आहेत युनिट वापरावरील दर

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी घेतली जात नाही. घरगुती किंवा अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे मोठया प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणतर्फे स्वस्त विजेचे पर्याय गणेश मंडळाना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम 2003 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव दि. 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महावितरणकडून गणेश उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवात या दरात होणार विजपुरवठा

- पहिल्या 100 युनिटसाठी 4 रूपये 71 पैसे प्रति युनिट.

- 101 ते 300 युनिटसाठी 8 रुपये 69 पैसे प्रति युनिट.

- 301 ते 500 प्रती युनिट वीज वापरासाठी 11 रुपये 72 पैसे प्रति युनिट.

- 500 युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी 13 रुपये 21 पैसे दराने वीजपुरवठा.

खबरदारीचे आवाहन

गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. गणेश उत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.

महत्त्वाचे नंबर

गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत.

बातम्या आणखी आहेत...