आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात 18 गावांमध्ये 341 जनावरांना लम्पी स्किन डिसीज:प्रशासनाकडून 1962 टोल फ्री क्रमांक जाहीर

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला जिल्ह्यात 18 गावांमध्ये 341 जनावरांना लम्पी स्किन डिसीज या संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा पशुसंवर्धन यंत्रणा सज्ज असून प्रभावित क्षेत्रातील (बाधीत जनावरांच्या 5 किमी परिघातील) जनावरांचे लसीकरण सुरू झाले आहे.

प्रभावित क्षेत्रातील जनावरांची संख्या 22 हजार 291 असून जिल्ह्यात 35 हजार लसींसाठी उपलब्ध आहे. पुढील शक्यता लक्षात घेता लसींचा आणखी साठा मागविण्यात आला असून पशुपालकांनी आपल्या जनावरांवर लक्ष ठेवावी जनावरांस संसर्ग झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे.

341 जनावरांना लागण

या संदर्भात पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात मौजे निपाना ता. अकोला, तसेच अकोट व तेल्हारा तालुक्यातील जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 18 गावांमध्ये 341 जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. अशा बाधित जनावरे आढळलेल्या गावांच्या पाच किमी परिघातील प्रभावित क्षेत्रात 57 गावे असून अशा गावांमध्ये 22 हजार 219 जनावरे आहेत.

सद्यस्थितीत प्रभावित क्षेत्रातील या सर्व जनावरांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 4 हजार 939 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून 141 जनावरे उपचारानंतर बरेही झाले आहेत, अशी माहितीही पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून पशूंची पाहणी

दरम्यान, आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निपाणा ता. अकोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन जनावरांची पाहणी केली व पशुपालकांचा मेळावा घेऊन त्यांना मार्गदर्शनही केले. जिल्ह्यातील अन्य भागातही पशु वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात क्षेत्रभेटी देत आहेत व जनावरांची पाहणी तपासणी करुन पशुपालकांमध्ये जनजागृती करीत आहेत. दरम्यान शासनाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यात बाधीत जनावरे आढळलेल्या ठिकाणापासून पाच किमी परिघाच्या क्षेत्रात गोट पॉक्स लसीकरण सुरू करण्यात आले आहे. गोठे निर्जंतूकीकरण (सोडियम हापोक्लोराईड फवारणी करुन) करण्यात येत असून गोचिड, गोमाशी, चिलटे निर्मूलनाचीही उपाययोजना करण्यात येत आहे.

पशुपालकांनी घाबरू नये

या आजाराने जनावरे दगावण्याचे प्रमाण हे 1 ते 5 टक्के इतके आहे, त्यामुळे पशुपालकांनी घाबरुन जाऊ नये. हा आजार बाह्य किटकांद्वारे पसरत असल्याने गोठ्यांमध्ये व बाधीत जनावरावर योग्य त्या प्रमाणात औषध फवारणी करावी. बाधीत जनावरांला अन्य जनावरांपासून वेगळे ठेवावे. बाधीत जनावरांच्या गोठ्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड 2 टक्के या औषधाची फवारणी करावी. पशुपालकांनी अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी 1962 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...