आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बद्दल केलेले वक्तव्य महाराष्ट्र व मराठी माणसाचा अपमान करणारे आहे. संवैधानिक पदावरील व्यक्तीने अशी विधाने करू नयेत असे संकेत व परंपरा आहे, पण हे महाशय राज्यपाल नसून भाज्यपाल आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काळ्या टोपीमधले संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. कोश्यारी यांचे मुंबईबद्दलचे वक्तव्य चीड आणणारे आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व महामहिम राष्ट्रपती यांनी कोश्यारी यांना परत बोलवावे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके यांनी केली आहे.
डोक्यावर काळी टोपी असलेल्या राज्यपालांच्या मेंदुत काळी टोपी व खाकी चड्डीची विचारधारा आहे. ती विचारधारा सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करणारी आहे.
मुंबईच्या जडणघडणीत वाटा
भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महाराष्ट्र विरोधी वक्तव्ये केली आहेत. महापुरुषांच्या बाबतीतही कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्ये केली आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही कोश्यारी यांनी बडबड करून महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. आज पुन्हा त्यांनी मुंबई बद्दल बोलून मर्यादांचे उल्लंघन केले आहे. मुंबईच्या जडणघडणीत मराठी माणसाचाच मोठा वाटा आहे पण मराठी माणसाचे योगदान नाकारून राज्यपाल कोश्यारी यांनी नाहक वाद निर्माण केला आहे. कोश्यारी यांचे वक्तव्य मुंबई व मराठी माणसाबद्दलचा त्यांचा द्वेष व्यक्त करणारे आहे.
महाराष्ट्राची माफी मागावी
या वक्तव्याबद्दल राज्यपाल यांनी मुंबई व मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे. भारतीय जनता पक्ष नेहमीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बाजू घेत असतो. मुंबई बद्दलचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य भाजपाला मान्य आहे का, याचा त्यांनी खुलासा करावा आणि त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे असे वाटत असेल तर कोश्यारी यांचा भाजपाने निषेध करून त्यांना परत पाठवण्याची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी करावी, असेही कपिल ढोके म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.