आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा रंगोत्सव आणि होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे रंगांचे वेध लागले आहेत. अशात दरवर्षी रासायनिक रंग खेळल्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी पर्यावरणपूरक रंगोत्सव साजरा करण्याचे आवाहन निसर्गकट्टा आणि पर्यावरण प्रेंमींकडून करण्यात येते. पालेभाज्या आणि फळभाज्यांपासून घरच्या घरी रंग तयार करण्याच्या प्रक्रियाही पर्यावरणप्रेमींनी सुचवल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक तसेच सुके रंग खेळण्याला प्राधान्य दिले जात आहे. अनेक शिक्षक, संस्था संघटना पर्यावरणपूरक रंग निर्मितीची कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना धडे देतात. रासायनिक रंग दीर्घकाळ त्वचेवर राहिल्यास त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ त्वचेवर राहतात. त्वचा अत्यंत नाजूक असल्याने त्वचेला ऍलर्जी होणे, त्वचा लाल होणे, खाजवणे आदी तक्रारीही समोर येतात. ऍलर्जी जास्त प्रमाणात झाली तर मान, हात आणि कानावर पुरळ आणि फोडं येतात. हे रंग डोळ्यात आणि कानात गेल्यास दुष्परिणाम होतात.
असे बनवा भाज्यांपासून रंग...
जांभळा : हा रंग तयार करण्यासाठी बीटची मुळे मिक्सरमध्ये बारीक करून मक्याच्या पिठात (कॉर्न फ्लाॅवर) मिसळावे. थोडा वेळ मिश्रण वाळू द्यावे व नंतर कुस्करून पावडर तयार करा. पिवळा : हळकुंड किंवा ओल्या हळदीची पेस्ट करून घ्या. ती मक्याच्या पिठात किंवा बेसनात मिसळा. थोडा वेळ वाळू द्यावी व नंतर कुस्करून पावडर तयार करावी. सुका रंग तयार होतो. ओला रंग : हळकुंड, ओली हळद खीसून रात्रभर पाण्यात भिजत घातल्यास पिवळा रंग तयार होतो. हा रंग त्वचेसाठी हितकारक आहे. हिरवा : पालकाची पेस्ट तयार करा. ती मक्याच्या पिठात मिसळा. वाळून कुस्करल्यानंतर सुका रंग तयार होतो. लाल : बीटपासून सुका आणि ओला अशा दोन्ही स्वरुपात रंग तयार करता येतो. जास्वंद किंवा गुलाबाची फुले वापरूनही हा रंग तयार होतो. काळा : काळा रंग तयार करण्यासाठी डाळिंबाच्या बिया किंवा साल बारीक करून भिजत घालावी. आवळा किसून लोखंडाच्या भांड्यात भिजून ठेवल्यास काळा रंग तयार होतो. केशरी : पळस फुले रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी उकडून घ्यावे. थंड द्रवाचा रंग म्हणून वापर करावा.
पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून होळी साजरी करा
विविध प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचा वापर करून घरच्या घरी सुरक्षित रंग तयार करता येतो. या रंगांमुळे त्वचेला कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. उलट अनेक रंग हे त्वचेसाठी फायद्याचे आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक रंगांचा वापर करून होळी साजरी करावी. - संदीप वाघडकर, पर्यावरणप्रेमी, शिक्षक
पेस्ट स्वरूपातील रंग
पेस्ट स्वरूपातील रंग तयार करण्यासाठी मैद्याचा वापर करावा. पालक पेस्ट किंवा बिटचा रस गाळून मैद्यात मिसळावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.