आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एससी- एसटी समिती:शाळा, महाविद्यालयात एससी- एसटी समिती कार्यान्वित करा

अकोला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा-महाविद्यालयात अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना जातीयवादाला सामोरे जावे लागत आहे. त्याला प्रतिबंध बसावा यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये अनुसूचित जाती-जमाती समिती कार्यान्वित करावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असोसिएशनने (डाटा) जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात म्हटले, की देशात अनुसूचित जाती, जमाती व मागासवर्गीय कर्मचारी व विद्यार्थी यांच्यावर जातीय मानसिक विकृतीतून अन्याय-अत्याचार होताना निदर्शनास येते. नुकतेच शाळेत शिक्षकाच्या माठातील पाण्याला हात लावला म्हणून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. ही घटना केवळ जातीय भावनेतून घडली आहे. अशा घटनांना आळा बसावा म्हणून शाळांमध्ये समिती कार्यान्वित करण्यात यावी. अनुसूचित जाती-जमातीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाना प्राचार्य, मुख्याधापक, व्यवस्थापन मंडळ, व्यवस्थापन अधिकारी हे वेतन आयोग, पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, सेवा निवृत्तीचा प्रस्तावासाठी त्रास देतात.

सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक, प्राचार्य पदे भरत असताना अनुसूचित जाती-जमातीच्या शिक्षकांना डावलून सेवा ज्येष्ठतेची खोटी यादी तयार करून प्रशासनाची दिशाभूल केली जाते आणि एससी, एसटीच्या शिक्षकांना संगनमत करून डावलले जाते. सेवा ज्येष्ठतेनुसार सहीचे अधिकार दिले जात नाही, अनुसूचित जाती व जमातीच्या कर्मचाऱ्यांविषयी खोटे दस्तावेज तयार करून, खोटी तक्रार करून प्राचार्य, व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापक यांच्या संगनमताने कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गंडांतर आणले जाते.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेते वेळी फी वसूल करणे व कोणत्याही प्रकारची पावती न देणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यावर शैक्षणिक संस्थेत जाती-जमातीच्या नावावर मानसिक त्रास देणे, मानसिक दबाव टाकणे. लैंगिक शोषण, मारहाण, अत्याचार आदी कारणांमुळे विद्यार्थी आत्महत्या करणे, शाळा, महाविद्यालय सोडून जाणे, अशा घटना घडतात. त्यामुळे अनुसूचित जाती -जमाती अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करावी. अनुसूचित जाती-जमातीच्या तक्रारी संदर्भात तीन महिन्यातून एकदा प्रादेशिक उपायुक्त यांनी सभा घेऊन अडी अडचणीच्या संदर्भात चौकशी करून तक्रारी त्वरित निकाली काढाव्यात, अशी मागणी केली आहे.

हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे देण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रसन्नजित गवई, जिल्हा सचिव प्रा. डॉ. विनोद खैरे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. एस. एम. भोवते, उपाध्यक्ष प्रा. राहुल घुगे, प्रा. राहुल माहुरे, सहसचिव प्रा. डॉ. दीपक कोच, प्रा. डॉ. अशोक इंगळे, प्रा. डॉ. प्रीती इंगळे (वाकपांजर), प्रा. अनिल निंबाळकर, प्रा. डॉ. हरिचंद नरेटी, प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, डॉ. बी. एस. किर्दक, प्रा. सुभाष दामोदर, प्रा. बी. बी. धारणे, डॉ. कैलास वानखडे, डॉ. डी. आर. खंडेराव, डॉ. भास्कर पाटील, डॉ. अशोक सोनोने, प्रा. दिलीप कुमरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...