आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेत मागील 22 वर्षापासून मानसेवी म्हणून सेवा देणाऱ्या मानसेवी कर्मचाऱ्यांना अद्यापही पुढील सहा महिन्याचे कामाचे आदेश प्रशासनाने दिलेले नाहीत. मागील 20 दिवसापासून हे कर्मचारी विना आदेशाने कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे कामाचे आदेश का नाहीत? पुढे आपले नेमके काय होणार? याबाबत या कर्मचाऱ्यांमध्ये विचारांचे काहूर उठले आहे.
महापालिका अस्तित्वात आल्यानंतर कामकाजाला गती मिळावी या हेतूने महापालिकेने तांत्रिकसह विविध पदावर मानसेवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. दर सहा महिन्यांनी या कर्मचाऱ्यांना दोन दिवसाचा खंड देवून कामाचे आदेश दिले जातात. मागील 22 वर्षापासून हा प्रकार सुरू आहे.
मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांना कायम आस्थापनेवर घेण्याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याने पावले उचललेली नाहीत. तुर्तास महापालिकेत पदाधिकारी नाहीत. त्यामुळे प्रशासकीय अधिकार आयुक्तांकडे आहेत. स्थायी समिती अथवा सर्व साधारण सभा नसल्याने या मानसेवी कर्मचाऱ्यांचे 25 ऑक्टोंबर रोजी कामाचे आदेश संपुष्टात आल्याने प्रशासक म्हणून या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आयुक्त कविता द्विवेदी यांनी मंजुर केला. प्रशासक म्हणून मंजुर केलेला प्रस्तावाची अंमलबजावणी मात्र अद्याप त्यांनी आयुक्त म्हणून केलेली नाही. त्यामुळे महापालिकेत कार्यरत 113 कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. आपल्याला पुढील सहा महिने कामाचे आदेश मिळणार की नाही? या चिंतेनेही हे कर्मचारी ग्रासले आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळेच आपले पुढे काय होणार? आपल्या कुटुंबाचे काय होणार? या चिंतामुळे मानसेवी कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
मानसेवी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देताना महापालिकेतील कार्यकारीणीने अनेकवेळ विलंब केला. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना मानसिक त्रासही सहन करावा लागला. आता कार्यकारीणी नसल्याने आता पुढील मुदतवाढ देताना विलंब होणार नाही, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र आता प्रशासक असताना कामाचे आदेश देण्यात विलंब केला जात आहे.
तसेच मागील 22 वर्षापासून कार्यरत मानसेवी कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने कामाचे आदेश देण्याचा घाटही घातला जात आहे, अशी माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली. त्यामुळे मागील 22 वर्षापासून अत्यल्प वेतनात काम करुन आता मानसेवी वरून कंत्राटी पद्धतीने नियुक्ती म्हणजे याच साठी केला होता अट्टहास तसेच 22 वर्षाची सेवा झाल्या नंतर हे फलीत, अशी चर्चाही या निमित्ताने सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.